
सांगली – सांगलीत ‘जय श्रीराम, भगवान परशुराम यांचा विजय असो’, अशा जयघोषात पारंपरिक वेशभूषेत परशुराम जयंतीची मिरवणूक पार पडली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या नेतृत्वाखाली परशुराम जयंतीच्या निमित्त काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत फुलांनी सजवलेली पालखी, गाडीवर परशुराम यांची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती.
मारुति चौकातील शिवतीर्थ येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते शोभायात्रेचा प्रारंभ झाला. या वेळी ‘पी.एन्.जी.’ सराफ पेढीचे संचालक श्री. सिद्धार्थ गाडगीळ, भाजपचे किसान मोर्चाचे उपाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पवार, माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. शहरातील विविध मार्गांवरून जाऊन टिळक स्मारक येथे शोभायात्रेचा समारोप झाला. टिळक स्मारक मंदिरात परशुराम जयंतीच्यानिमित्त महिलांनी पाळणा म्हटला. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या शोभायात्रेत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश ठाणेदार, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष केदार खाडीलकर, महिला आघाडीच्या अध्यक्ष कविता कुलकर्णी, पुरोहित आघाडीचे अध्यक्ष अमोल कुलकर्णी, चित्पावन संघाचे अध्यक्ष वामन बर्वे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक चापोरकर यांच्यासह ब्राह्मण समाजातील विविध पोटजातीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.