सांगली, १ मे (वार्ता.) – भारतमातेचे पांग फेडणारा हिंदुस्थान शिवछत्रपतींच्या स्फूर्ती प्रेरणेतून घडवल्याविना रहाणार नाही, असा विश्वास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला. प्रतिवर्षीप्रमाणे भाजप महिला मोर्चा प्रदेश महामंत्री अधिवक्त्या सौ. स्वाती शिंदे यांच्या ‘मातोश्री महिला भाजी विक्रेता संघ’ यांच्या वतीने रिसाला रोड भाजी मंडई, सांगली येथे मोठ्या थाटामाटात ‘शिवोत्सव – २०२५’चा प्रारंभ पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या शुभहस्ते नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
येथे ‘मातोश्री भाजीपाला विक्रेता संघा’कडून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी हिंदु एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्री. नितीन शिंदे, अधिवक्त्या सौ. स्वाती शिंदे, सर्वश्री गजानन मोरे, निखिल सावंत, प्रसाद रिसवडे, प्रदीप निकम, राहुल माने, कल्पना जाधव, सुनीत भोसले, मंजुळा कुंभार, शोभा शिंदे आदी उपस्थित होते.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘देशाची आजची परिस्थिती आणि १ सहस्र वर्षांपासूनची परिस्थिती ही कायमच भयावह स्थिती आहे. खचत, पिचत आणि नासत चाललेल्या देशाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. आपल्याला हिंदुस्थान आणि हिंदु समाज एकत्र ठेवायचा असेल, तर प्रत्येकाच्या मनात, रक्तात छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचे बीजमंत्र घट्टपणाने करू’’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.