♦ कामकाजावर परिणाम ♦ सामान्य नागरिकांची फरफट ♦ प्रशासनही नोंद घेईना |
(‘बायोमेट्रिक यंत्र’ म्हणजे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी शासकीय कार्यालयात कधी येतात आणि कधी परत जातात, याच्या वेळेची नोंद करणारे यंत्र.)

आळंद (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – जिल्ह्यातील आळंदसह परिसरात असलेल्या विविध शासकीय कार्यालयांत ‘बायोमेट्रिक यंत्र’ नसल्याने अधिकारी आणि कर्मचारी कधीही येतात अन् कधीही जातात. याचा फटका कामासाठी येणार्या नागरिकांना बसत आहे. सामान्य नागरिकांची फरफट होत आहे. काही ठराविक कर्मचारी विलंबाने येऊनही नोेंदणीवहीत लवकर आल्याची वेळ लिहून नंतर लवकर निघून जातात. याचा कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. (संबंधित कामचुकार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर प्रशासन कोणती कारवाई करणार आहे ? – संपादक)

कामानिमित्त आलेल्या नागरिकांना ‘साहेब बाहेर आहेत’, असे उत्तर ऐकावे लागत आहे, तर काही कर्मचारी तालुक्याचे काम सांगून वेळ काढत आहेत. एकूणच ऐन उन्हाळ्यात शासकीय कार्यालयेही दुपारी बंद असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी वेळेत यावेत आणि वेळेत जावेत, यासाठी ‘बायोमेट्रिक उपस्थिती यंत्रणा’ बसवण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. मुख्य शासकीय कार्यालय वगळता अजूनही अनेक कार्यालयांत ही यंत्रणा नाही. बायोमेट्रिक यंत्रणा नसलेल्या कार्यालयांत अनेक अधिकारी, कर्मचारी वेळेत येत नाहीत.

पुढील कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्र नाहीत !
पशूवैद्यकीय केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, महावितरण, जिल्हा मध्यवर्ती बँक, पोस्ट कार्यालय, सेवा संस्था कार्यालय, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, तलाठी ऑफिस या कार्यालयांत बायोमेट्रिक यंत्र नाही.
पुढील कार्यालयात अधिकारी आढळले नाहीत !
१. जिल्हा बँक : शाखाधिकारी
२. प्राथमिक आरोग्य केंद्र : वैद्यकीय अधिकारी (२) इतर कर्मचारी अनुपस्थित
३. पशू वैद्यकीय दवाखाना : कुलूप बंद : वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित, कामकाजावर परिणाम, सामान्य नागरिकांची फरफट, प्रशासनही नोंद घेईना.
४. पोस्ट ऑफिस : कुलूप बंद
‘जिल्हाधिकार्यांनी कर्मचार्यांना वेळेत येण्याचे आदेश देऊनही त्यांच्यावर फरक पडलेला दिसत नाही. काही कर्मचारी वगळता अनेक कर्मचारी हे वेळेवर येत नसल्याचे चित्र आहे. आमच्या मुख्य शाखेत बायमेट्रिक सुविधा उपलब्ध असून लवकरच तालुक्यातील इतर शाखांतही बसवण्याची प्रक्रिया चालू आहे. यामुळे कर्मचार्यांवर वचक बसेल.
– सुरेश कोलते, लोन ऑफिसर, जिल्हा मध्यवर्ती बँक |