Kanchi Kamakoti Peetam : आचार्य गणेश शर्मा हे कांची कामकोटी पीठाचे उत्तराधिकारी म्हणून घोषित !

शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती (उजवीकडे) आचार्य गणेश शर्मा (डावीकडे) यांना दीक्षा देताना

कांचीपूरम् (तमिळनाडू) : अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी कांची कामकोटी पीठाचे ७१ वे शंकराचार्य म्हणून २५ वर्षीय आचार्य गणेश शर्मा यांना विधीवत् घोषित करण्यात आले आहे. त्यांचे नामकरण सत्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती करण्यात आले आहे. कांची मठात त्यांचा अभिषेक करण्यात आला. कांची मठाच्या परिसरात झालेल्या भव्य समारंभात देशभरातील वेदाचार्य, भिक्षू, धार्मिक नेते आणि भक्त उपस्थित होते. विद्यमान शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती यांनी स्वतः त्यांना संन्यासाची औपचारिक दीक्षा दिली. आचार्य गणेश शर्मा हे शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती यांचे उत्तराधिकारी असणार आहेत. कांची कामकोटी पीठाची स्थापना आदि शंकराचार्य यांनी केली होती आणि हा मठ शंकराचार्य परंपरेतील ५ पीठांपैकी एक आहे. हा मठ अद्वैत वेदांत आणि वैदिक शिक्षणाचे केंद्र राहिला आहे.

आचार्य गणेश शर्मा यांचा परिचय

आचार्य गणेश शर्मा

आचार्य गणेश शर्मा यांचे मूळ नाव दुड्डू सत्य वेंकट सूर्य सुब्रह्मण्यम् गणेश शर्मा द्रविड आहे. ते आंध्रप्रदेशाचे रहिवासी आहेत. त्यांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि इतर धार्मिक ग्रंथांतील ज्ञान संपादन केले आहे.