संशयास्पद ढाचे आढळले, तर उद्ध्वस्त केले जातील !

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिहादी प्रकार आणि जिहादी माणसे चालणार नाहीत. कुणालाही सोडले जाणार नाही. मी कडवट हिंदुत्वनिष्ठ आहे. भेडशी येथील घटनेविषयी माझे पोलीस अधीक्षकांशी बोलणे झाले आहे. जिल्ह्यात असलेल्या मदरशांची पडताळणी करावी आणि या मदरशांमध्ये नेमके काय चालते ? याची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. त्या ठिकाणी खरोखरच शिक्षण दिले जाते कि आतंकवादी घडवले जातात ? हे पाहिले जाईल आणि अशा प्रकारचे जे ढाचे असतील ते उद्ध्वस्त केले जातील, अशी चेतावणी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील जनतेला दिली आहे.
थोरलेभरड, साटेली भेडशी येथील मदरशामध्ये तलवारी सापडल्या आहेत. ही इमारत एका व्यक्तीने घरासाठी बांधली होती. तेथे मदरसा चालवला जात होता. तेथे काही संशयास्पद गोष्टी घडत असल्याचा आरोप करत हिंदुत्वनिष्ठांनी या ठिकाणी जाऊन संबंधितांना खडसावले होते. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत संबंधित मदरशात २ तलवारी आणि बिहार येथील एक मुसलमान सापडला होता. याविषयी पत्रकारांनी पालकमंत्री राणे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘असे प्रकार माझ्या जिल्ह्यात मी खपवून घेणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुलडोझर हे रस्त्याच्या कामासाठी वापरतांना दिसतात. त्या व्यतिरिक्त हे बुलडोझर अशा अवैध आणि देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी चालवले जातील. या घटनेसह जिल्ह्यात अन्य काही ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. शिकवणीच्या नावाखाली जिहादी कारवाया केल्या जात आहेत. हे प्रकार या जिल्ह्यात, तसेच महाराष्ट्र आणि देशात खपवून घेतले जाणार नाहीत.