मिरवणुकीत डीजे, बँडपथक, आतषबाजी यांना फाटा !

छत्रपती संभाजीनगर – प्रतिवर्षी ब्राह्मण समाज समन्वय समितीच्या वतीने काढण्यात येणार्या मिरवणुकीत डीजे, बँडपथक, आतषबाजी केली जाते; परंतु जम्मू-काश्मीर येथे झालेल्या पर्यटकांवरील आक्रमणाचा निषेध म्हणून यंदाच्या परशुराम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे, बँडपथक, आतषबाजीला फाटा देण्यात आला. ५ ढोल पथकांसह ३ रथ, घोडे अशा सजीव देखाव्याने लोकांचे लक्ष वेधले होते.
२९ एप्रिल या दिवशी क्रांती चौकातून काळ्या फिती लावून वाहन फेरी काढण्यात आली. पैठण गेट येथे पोचून लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्यात आले. नंतर समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून औरंगपुरा येथील परशुराम स्तंभ येथे समारोप झाला. गतवर्षी १५०, तर यंदा १७५ महिला, १२५ पुरुष असा ३०० जणांचा फेरीत सहभाग होता. या वेळी ब्राह्मण समाज समन्वय समितीचे सचिव मंगेश पळसकर, कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, विजया अवस्थी, शिरीष बोराळकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, समन्वय समितीचे प्रकल्पप्रमुख संधी लेखापाल लक्ष्मीकांत जयपूरकर यांची उपस्थिती होती.
सायंकाळी संस्थान गणपति येथून मिरवणूक निघाली. पहलगाम येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध करणारे फलक दाखवण्यात आले. एका फलकावर नृसिंहाचे चित्र आणि आक्रमणातील पर्यटक असा देखावा होता. विप्र फाऊंडेशनद्वारे समर्थनगर येथील श्रीराम मंदिरात सकाळी संधी लेखापाल लक्ष्मीकांत जयपूरकर, मिलिंद दामोदरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, तसेच दत्ताजी भाले रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित शिबिरात ३७ दात्यांनी, तर हडको पवननगर येथे २२, तर शिवाजीनगर येथे १२ जणांनी रक्तदान केले. परशुराम जयंतीनिमित्त मुली आणि महिला यांनी पथनाट्य सादर केले.