पुणे येथील बी.जे. मेडिकल महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरणी ३ विद्यार्थी निलंबित !

  • मंत्रालय स्तरावर तक्रार केल्यानंतर अन्वेषण चालू

  • वसतीगृह तात्काळ सोडून देण्याच्या सूचना

पुणे येथील बी.जे. मेडिकल महाविद्यालय

पुणे – शहरातील ‘ससून रुग्णालया’च्या ‘बी.जे. मेडिकल महाविद्यालया’मध्ये ‘रॅगिंग’ (गैरवर्तन, मनात लज्जा उत्पन्न होईल अशी कृती) केल्याची घटना घडली आहे. ऑर्थोपेडिक्स (हाडांशी संबंधित) विभागातील पहिल्या वर्षात शिकणार्‍या निवासी आधुनिक वैद्यांना वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून काही महिन्यांपासून त्रास दिला जात होता. संबंधित विद्यार्थ्याने महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार केली होती; पण त्याची नोंद घेतली गेली नाही. (महाविद्यालय प्रशासनाने नोंद का घेतली नाही ? हेही पहाणे आवश्यक ! – संपादक) त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी थेट मंत्रालय स्तरावर तक्रार दिली. तेव्हा या गंभीर घटनेची नोंद घेत महाविद्यालय प्रशासनाने ३ विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. निलंबित विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह रिकामे करण्यासही सांगितले आहे.

रॅगिंगची घटना बाहेर येऊ नये यासाठी महाविद्यालयाने तरुणाची ओळख आणि झालेल्या घटनेची कुठेही वाच्यता केली नव्हती. तशी योग्य ती काळजी घेतली होती; परंतु पीडित विद्यार्थी हा पुण्यातील प्रतिष्ठीत कुटुंबातील असल्याने कुटुंबियांनी थेट मंत्रालय स्तरावर तक्रार केली. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता आधुनिक वैद्य एकनाथ पवार म्हणाले, ‘‘या संपूर्ण प्रकरणाची नोंद गांभिर्याने घेतली असून तात्काळ कारवाई केली आहे. भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी ‘अँटी रॅगिंग समिती’ची स्थापना करण्यात आली आहे.’’

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘एका निवासी आधुनिक वैद्याने ‘रॅगिंग’ केल्याची तक्रार केली होती. त्याची गंभीर नोंद घेत त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित केली जाईल.’’

संपादकीय भूमिका

रॅगिंग करणार्‍या वरिष्ठ विद्यार्थ्यांना केवळ निलंबित करून न थांबता त्यांना कठोर शिक्षा केल्यासच हे अपप्रकार थांबतील !