१ मे या दिवशी ‘गाणगापूर बंद’ची हाक !

श्री दत्त मंदिर म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती निर्गुण पादुका मंदिर

गाणगापूर, ३० एप्रिल (वार्ता.) – येथील श्री दत्त मंदिर म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती निर्गुण पादुका मंदिराचा काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणे व्यापक विकास व्हावा. या परिसरात सुसज्ज कॉरिडॉर होण्यासह भक्तनिवास, वाहनतळ, दर्शन व्यवस्था, भीमा-अमरजा संगम स्थानाची स्वच्छता आणि घाट बांधणे अशा विविध कामांच्या पूर्ततेसाठी ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि भाविक यांनी १७ एप्रिल २०२५ पासून मंदिराच्या समोरच धरणे आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून १ मे या दिवशी ग्रामस्थ आणि भक्त यांच्याकडून ‘गाणगापूर बंद’ची हाक देण्यात आली आहे. या दिवशी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत परिसरातील दुकाने आणि हॉटेल्स बंद रहातील.