आरोपी उपसंचालक उल्हास नरड आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक नीलेश मेश्राम निलंबित !

बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण

उल्हास नरड

नागपूर – बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी उपसंचालक उल्हास नरड आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक नीलेश मेश्राम यांचे निलंबन करण्यात आले आहे. १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शासनाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

पराग पुडके यांची बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकपदी नियुक्ती करून नंतर त्यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली होती. या प्रकरणी उपसंचालक उल्हास नरड यांना अटक करण्यात आली होती.  त्यानंतर शिक्षक पराग पुडके, अधीक्षक नीलेश मेश्राम, लिपिक सूरज इंगळे आणि उपनिरीक्षक संजय दुधाळकर यांनाही अटक करण्यात आली. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिक्षण उपसंचालक पदाचा अतिरिक्त प्रभार दीपेंद्र लोखंडे यांच्याकडे देण्यात आला असून मेश्राम यांच्या जागी हरडे यांना दायित्व दिले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथक अधीक्षक पदाचा अतिरिक्त प्रभार गौतम गेडाम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

शिक्षण क्षेत्राला अपकीर्त करणार्‍यांचे निलंबन नको, तर त्यांच्यावर बडतर्फीचीच कारवाई करायला हवी !