पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये

२४.२.२०२५ या दिवशी बांदिवडे, फोंडा, गोवा येथील सौ. ज्योती सुदिन ढवळीकर या सनातनच्या १३२ व्या (समष्टी) संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एका अनौपचारिक सोहळ्यात ही आनंदवार्ता देण्यात आली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती आणि पू.ज्योतीताईची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. ३०.४.२०२५ या दिवशी या गुणवैशिष्ट्यांचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/908579.html

 पू. (सौ.) ज्योती ढवळीकर

३. पू. (सौ.) ज्योतीताईची गुणवैशिष्ट्ये

३ आ २. शिक्षण, नोकरी, विवाह आदी महत्त्वाच्या प्रसंगांमध्येही वडीलधार्‍यांच्या इच्छेला मान देणे : ज्योतीताईला अधिकोषात नोकरी मिळाली. तेव्हा तिला ‘एम्.एस्.सी.’ला प्रवेश मिळूनही वडिलांच्या सांगण्यावरून तिने शिक्षणाऐवजी नोकरीची निवड केली आणि त्यांचा आदर राखला. इतकेच नव्हे, तर विवाह करतांनाही आई-वडिलांच्या सांगण्यालाच प्राधान्य दिले. त्यापुढेही सांसारिक जीवनात सासू-सासरे, पती, चार दीर, चार नणंदा, जाऊ आणि आता मुले यांच्यासमवेत परेच्छेने वागणे चालूच राहिले.

३ इ. ज्योतीताईने घरातील सर्व कुलाचार, तसेच अन्य धार्मिक कार्ये भावपूर्णतेने करणे : ताईची कुलदेवता श्री विजयादुर्गा आणि श्री महालक्ष्मी देवी यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. त्यामुळे ती सर्व कुलाचार भावपूर्ण रितीने करते. तिचे सासरे (कै. अप्पा ढवळीकर) महालक्ष्मीच्या मंदिरात देवीची पूजा करत असत. त्यामुळे ‘महिन्यातील १५ दिवस श्री महालक्ष्मीदेवीची पूजा आणि सोवळ्यातून नैवेद्य बनवणे, या परंपरेने चालत आलेल्या सेवा त्यांच्या निधनानंतर आजही तशाच चालू आहेत. त्यांच्या घरात सातत्याने काही धार्मिक कार्येही होत असतात. या सर्वांचे कुशलतेने नियोजन करून आणि सर्वांना सामावून घेऊन ही सेवा ताई भावपूर्णरित्या करते. कुटुंबातील अन्य सदस्यांचेही तिला सहकार्य असते, हेही तितकेच महत्त्वाचे !

३ ई. अहं अल्प असल्यामुळे सर्वांशी समभावाने आणि प्रेमळपणे वागणे : ज्योतीताईचे यजमान (गाेवा राज्याचे वीजमंत्री मा. श्री. सुदिन ढवळीकर) राजकारणात असल्यामुळे समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींशी तिचा संबंध येतो. त्यामुळे अहं वाढण्याचा पुष्कळ धोकाही असतो; परंतु घरातील मंडळी, सेवकवर्ग आणि साधक या सर्वांशी ती सारख्याच प्रेमाने बोलते.

३ उ. ईश्वरावरील दृढ श्रद्धेमुळे मनाला स्थिरता येऊन प्रत्येक प्रसंगाला शांतपणे सामोरे जाणे : चार वर्षांपूर्वी पू. (सौ.) ज्योतीताईची ‘अँजिओप्लास्टी’ झाली. (‘अँजिओप्लास्टी’ : हृदयाच्या रक्तवाहिनीतील अडथळा दूर करण्यासाठी केले जाणारे एक प्रकारचे शस्त्रकर्म.) त्या वेळी एक दिवस मला तिच्या समवेत रुग्णालयात रहाण्याचा योग आला. रुग्णालयात असतांना एकदा तिने माझ्याकडे नॅपकीन मागितला. तो देण्यासाठी मी तिची बॅग उघडल्यावर आतमध्ये नीटनेटकेपणाने ठेवलेले कपडे पाहून मी तिला मनोमन वंदन केले. सर्वसाधारणपणे रुग्णाईत व्यक्तीच्या मनाची स्थिती नाजूक असते, तिला एक प्रकारचा ताण असतो; परंतु पू. (सौ.) ताईच्या बाबतीत असे काहीच नव्हते. जणूकाही हे उपचार म्हणजे तिच्यासाठी दिलेली एक सेवा होती आणि ती शांतपणे ती सेवा करत होती. यानंतर १५ ते २० दिवसांतच तिच्या मुलीच्या प्रसुतीचा दिनांक दिलेला होता; परंतु ज्योतीताईच्या चेहर्‍यावर कोणताही ताण नव्हता. या प्रसंगातून ‘ताईची ईश्वरावरील श्रद्धा आणि त्यामुळे तिच्या मनाला आलेली स्थिरता’, हे गुण दिसून आले.

३ ऊ. साहाय्यासाठी सदा तत्पर असणे : आमच्या मुलाचा विवाह कोरोना महामारीच्या काळात झाला. त्या वेळी कोणतीही अडचण आल्यास ताई तत्परतेने साहाय्य करत असे. ‘तिच्या रूपात देवीने मला काहीच न्यून पडू दिले नाही’, असे मला वाटते. तिच्या या गुणामुळे कुटुंबातही सर्वांना तिचा आधार वाटतो.

३ ए. कुटुंब आणि राजकारण या दोन्ही ठिकाणी यजमानांना सहकार्य करून ‘धर्मपत्नी’ ही संज्ञा सार्थ करणे : आरंभी तिचे यजमान निवडणुकीसाठी उभे राहिल्यावर ती थोडी अस्थिर झाली; परंतु नंतर तिने ‘ही एक प्रकारची सेवाच आहे’, असे मानून येणार्‍या प्रसंगांना भावाची जोड दिली. त्यामुळे परेच्छेने वागल्याने तिची साधना झाली. यजमान राजकारणात असल्यापासून जवळ जवळ प्रतिदिन तिला कुठल्या ना कुठल्या समारंभाला जावे लागते; पण तिने कधीच याविषयी नाराजी व्यक्त केली नाही. काही वेळा मतभेदही झाले; परंतु ‘आपलेच ऐकायला हवे’, असा आग्रह तिने कधी धरला नाही.

३ ऐ. प्रसाराची आणि साधनेची तळमळ        

१. महनीय व्यक्ती, म्हणजे मंत्र्यांची पत्नी असल्यामुळे ताईला अनेक समारंभात बोलावले जाते. त्या ठिकाणी बोलतांनाही ती व्यवहार आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम साधते.

२. धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्ताने ती प्रसार साहित्याचे वाटप करते.

३. दीपावलीच्या निमित्ताने ढवळीकर कुटुंबाकडून शुभेच्छापत्रे दिली जातात. या शुभेच्छा पत्रांवर सनातन-निर्मित सात्त्विक चित्रे आणि साधनेविषयी उपयुक्त लिखाण असते.

– सौ. श्रुति सहकारी (वय ५९ वर्षे) (पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची लहान बहीण), फोंडा, गोवा. (५.३.२०२५)   (क्रमशः)

सौ. श्रुति सहकारी

पू. ज्योतीताई, शांत
अन् मनमिळावू स्वभावाचे
आहे वरदान तुला ।

परीस जसा स्पर्शमात्रे लोहाला सुवर्ण बनवतो ।
प.पू. डॉक्टरांमुळे आम्ही घडलो, कृतज्ञताभाव मनी दाटतो ।। १ ।।

प्रेम त्यांचे साधकांप्रती, प्रगतीसाठीही तेच झटती ।
श्रीकृष्णाला साहाय्यास पाठवले, केली कृपा आम्हावरी ।। २ ।।

अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी जन्म तुझा झाला ।
साधनेचे अक्षय्य वाण आहेच सोबतीला ।। ३ ।।

जन्मनाम असे ‘ज्योती’, अध्यात्मातही ते सार्थ ठरे ।
तिमिर दूर करण्याची सेवा तुझ्या हातून घडे ।। ४ ।।

शांत, मनमिळावू स्वभावाचे आहे वरदान तुला ।
साहाय्यास सदैव तत्पर याचे कौतुक वाटे आम्हाला ।। ५ ।।

राजकारणातही अध्यात्म पहाण्याचा यत्न तुझा चांगला ।
म्हणूनच प.पू. गुरुदेवांनाही तो अती भावला ।। ६ ।।

– सौ. श्रुति सहकारी (वय ५९ वर्षे) (पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची लहान बहीण), फोंडा, गोवा. (५.३.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक