Chinmoy Das Granted Bail : बांगलादेशातील हिंदु नेते चिन्मय दास यांना जामीन संमत

चिन्मय कृष्ण दास यांना जामीन

ढाका (बांगलादेश) – बांगलादेश उच्च न्यायालयाने इस्कॉनचे नेते चिन्मय कृष्ण दास यांना जामीन संमत केला. दास यांना २५ नोव्हेंबर २०२४ या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला होता. चिन्मय कृष्णा दास यांच्या अटकेविषयी भारताने बांगलादेशकडे तीव्र निषेध नोंदवला होता.

चिन्मय कृष्ण दास यांची सुटका होईल का ?

चिन्मय यांचे अधिवक्ता प्रोलाद देब नाथ यांनी बांगलादेशी माध्यम ‘द डेली स्टार’ला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या अपीलीय विभागाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही, तर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चिन्मय दास यांची कारागृहातून सुटका होण्याची अपेक्षा आहे.

चिन्मय कृष्ण दास यांना का अटक करण्यात आली ?

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध अनेक निदर्शने करणारे चिन्मय कृष्णा दास यांना २५ नोव्हेंबर या दिवशी ढाका विमानतळावर ढाका पोलिसांच्या गुप्तहेर शाखेने अटक केली होती. हिंदूंच्या मोर्चाच्या वेळी बांगलादेशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. याविरोधात इस्कॉन आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी व्यापक निषेध आंदोलने केली. दास यांचा जामीन अर्ज अनेक वेळा फेटाळण्यात आला.