
सांगली – खरशींग येथील श्रीराममंदिर आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पादुका मंदिराच्या प्रांगणात ५१ गायींचा ‘श्री महाराजांची गोशाळा’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पायाभरणी आणि भूमीपूजन समारंभ १ मे या दिवशी सकाळी १०.३० वाजता होत आहे, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त प्रदीप सव्वाशे, संगीता सव्वाशे यांनी दिली.
देशींगचे प.पू. आनंद गिरी महाराज, दीपक केळकर, ह.भ.प. डॉ. संजय कोटणीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या वेळी गोव्याचे अवधूत रायकर हे उपस्थित रहाणार आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील दंडोबा डोंगराच्या निसर्गरम्य पायथ्याशी उभारण्यात आलेल्या श्रीराममंदिर आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिराच्या स्थापनेला ३ वर्षे होत आली. या मंदिरात प्रतिदिन दुपारी १२ वाजता आणि रात्री ७.३० वाजता आरती, प्रसाद असतो. या ठिकाणी मंदिर सेवा मंडळ आणि अन्नछत्र सेवा मंडळाच्या माध्यमातून सेवा चालू आहे.