कोलवा (गोवा) येथील भंगारवाल्याकडून लाच घेतल्याचे प्रकरण
पणजी, २९ एप्रिल (वार्ता.) – कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांना लाच घेतल्याच्या प्रकरणी सेवेतून निलंबन करण्याची घटना ताजी असतांनाच आता भंगारवाल्याकडून लाच घेतल्याच्या प्रकरणी कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रितेश तारी यांचे स्थानांतर करण्यात आले आहे, तर भंगारवाल्याकडून लाच घेतल्याच्या प्रकरणी २८ एप्रिल या दिवशी कोलवा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमर गावकर, सिद्धेश शिरोडकर आणि सत्यम देसाई यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक टिकम सिंग यांनी हा निलंबनाचा आदेश दिला आहे. दमदाटी करून भंगारवाल्यांकडून पैसे घेतल्याचे चौकशीअंती समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली.
चौकशी अहवालानंतर कारवाई
कोलवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अमर गावकर, सिद्धेश शिरोडकर आणि सत्यम देसाई यांनी काही दिवसांपूर्वी भंगार घेऊन जाणार्या एका वाहनाला अडवले होते. या वेळी पोलिसांनी, ‘अन्वेषण करून चोरीचे सामान असल्याचे सांगून तुझ्यावर कारवाई करणार आणि तुला कारागृहात टाकणार’, अशी भीती वाहनचालकाला दाखवली आणि त्याच्याकडून पैसे उकळले. या प्रकरणानंतर भंगारवाल्याने कुणाकडेही तक्रार नोंदवली नव्हती; मात्र त्याच भंगारवाल्याला मायणा-कुडतरी पोलिसांनी एका वेगळ्या प्रकरणात पकडले असता त्याने कोलवा पोलिसांनी लाच घेऊन आपली सुटका केल्याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण करून त्याचा अहवाल दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांना दिला होता. हा अहवाल मिळाल्यानंतर ही कारवाई झाली.