माकासान (सालसेत) येथील घटना
मडगाव, २९ एप्रिल (वार्ता.) – वाळपई येथे २४ वर्षीय मुलाचा त्याचे वडील आणि सख्खा भाऊ यांनी इतर एका व्यक्तीच्या साहाय्याने हत्या केल्याची घटना ताजी असतांनाच आता किरकोळ कारणावरून चिडलेल्या सावत्र पित्याने अमानुष मारहाण केल्याने ६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सालसेत तालुक्यातील माकासान येथे समोर आली आहे.
ही घटना माकासान येथे २८ एप्रिल या दिवशी घडली. सलीम हजारेसाब दांबल (वय २८ वर्षे) असे संशयिताचे नाव असून तो मूळ गदग, कर्नाटक येथील आहे. मुलगी गतप्राण झाल्याचे समजल्यावर संशयित पसार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. सानिका असे मृत मुलीचे नाव आहे. कुडतरी पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम १०३(१), ११५ (२) आणि गोवा बाल कायद्याचे कलम ८ (२) अंतर्गत संशयिताच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
संशयित गदग, कर्नाटक येथे मौलवी होता
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूळ गदग, कर्नाटक येथील दांबल कुटुंबीय हल्लीच गोव्यात कामाच्या शोधासाठी आले होते. संशयित सलीम हजारेसाब दांबल हा त्याच्या गावात मौलवी म्हणून काम करत होता. माकासान येथे त्याला एका बांधकामाचे काम मिळाले होते. तेथे तो एका झोपडीत पत्नी, मुलगी आणि मुलगी यांच्यासह रहात होता.