वनमंत्री विश्वजीत राणे वनपाल नवीन कुमार यांच्यावर भडकले

पणजी, २९ एप्रिल (वार्ता.) – सांगे येथे लोकवस्तीत फिरतांना घायाळ अवस्थेत एक बिबटा वाघ आढळला होता. या बिबटा वाघाला बोंडला अभयारण्यात नेण्यात आले होते. या बिबट्याचा २८ एप्रिलला रात्री २ वाजता बोंडला अभयारण्यात मृत्यू झाला. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी या प्रकरणाचे अन्वेषण करण्याचा आदेश दिला आहे. मंत्री विश्वजीत राणे म्हणाले,‘‘या प्रकरणी कर्तव्यात कसूर करणारे वनपाल (वन्य प्राणी विभाग) नवीन कुमार यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना सेवेतून निलंबित करून गोव्यातून हाकलून देण्याची आवश्यकता आहे. वनपाल (वन्य प्राणी विभाग) नवीन कुमार हे वातानुकूलित खोलीत बसून कारभार हाकतात. आम्हाला असले फुकटचे वेतन घेणारे अधिकारी नको आहेत. ’’
वनमंत्री विश्वजीत राणे पुढे म्हणाले, ‘‘राज्यात घायळ वन्य प्राण्यांवर उपचार करण्याची सोय नाही. यासाठी अत्याधुनिक रुग्णालयाची आवश्यकता आहे. याविषयी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे. प्राण्यांवर उपचार करण्यासाठी अशासकीय संस्थांचेही साहाय्य घेण्यात येणार आहे. वन क्षेत्र असलेल्या भागांतून जाणार्या रस्त्यांवर गतिरोधक बसवण्यासाठी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्याशी चर्चा करणार आहे. गतीरोधकांमुळे वाहनांची वन्य प्राण्यांना धडक बसण्याचे प्रकार अल्प होतील आणि त्यांचा जीव वाचेल.’’