१५ ऑगस्टपासून शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन ! – मुख्यमंत्री

सेवा ऑनलाईन नसल्यास दंड आकारणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – १५ ऑगस्ट २०२५ पासून शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. जो विभाग १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणार नाही, त्या विभागाला प्रत्येक दिवशी प्रत्येक सेवेसाठी १ सहस्र रुपयांचा दंड आकारला जाईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ एप्रिल या दिवशी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे सामान्य प्रशासन विभाग (प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन) आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या कार्यवाहीची ‘दशकपूर्ती’ आणि ‘प्रथम सेवा हक्क दिन’ यांनिमित्त राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

‘शासनाच्या सर्व सेवा व्हॉट्सॲपवर, तसेच सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध झाल्यास अनेक तक्रारी न्यून होऊन लोकांचे जीवनमान सुसह्य होईल’, असेही मुख्यमंत्री म्हणाले.