उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. अर्जुन सम्राट देशपांडे हा या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२५ मध्ये कु. अर्जुन सम्राट देशपांडे याची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के आहे.’ – संकलक)
‘अक्षय्य तृतीया (३०.४.२०२५) या दिवशी कु. अर्जुन सम्राट देशपांडे याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. अर्जुन सम्राट देशपांडे याला १० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. समंजस
‘कु. अर्जुन मोठ्या मुलांशी मोठ्यांप्रमाणे खेळतो आणि वागतो. तो त्याच्यापेक्षा लहान मुलांशी प्रेमाने बोलून त्यांना सांभाळून घेतो. अर्जुन ६ वर्षांचा असतांना आम्ही पुण्याहून लांजा येथे स्थलांतर केले. तेव्हा त्याने सर्वांशी जुळवून घेतले. त्याला खाण्या-पिण्यात आवड-नावड नाही. आम्ही कामानिमित्त बाहेर गेल्यास तो शेजार्यांच्या घरी चांगल्या प्रकारे रहातो.
२. प्रेमभाव
तो स्वतःच्या वस्तू इतरांना सहजतेने देतो. त्याला कुणी खाऊ दिल्यास तो प्रथम इतरांना खाऊ देतो आणि नंतर स्वतः घेतो.
३. धर्माभिमानी आणि राष्ट्राभिमानी
तो प्रतिदिन टिळा लावून शाळेत जातो. त्याला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तसेच मावळे यांच्याप्रती ओढ आहे. त्याला आपला इतिहासही आवडतो. तो ऐतिहासिक चित्रपट पहातो. त्याला अन्य चित्रपट पहायला आवडत नाही.
४. शिकण्याची आणि ऐकण्याची वृत्ती
त्याच्याकडून चूक झाल्यास तो संबंधितांची क्षमा मागतो. ‘मोठ्यांचा आदर करणे, त्यांची प्रेमाने विचारपूस करणे, जेवतांना संबंधितांना ‘जेवण आवडले’, असा प्रतिसाद देणे’, याविषयी त्याला सांगितल्यापासून तो तसे प्रयत्न करतो. मागील २ मासांपूर्वी आम्ही त्याला भ्रमणभाष वापरण्याचे आणि दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहाण्याचे दुष्परिणाम सांगितले. त्यानंतर त्याने भ्रमणभाष वापरणे आणि दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम पहाणे बंद केले.
५. व्यष्टी साधना
तो प्रतिदिन ६ माळा नामजप करतो. पूर्वी तो व्यष्टी साधनेचा आढावा देण्यास टाळत असे; मात्र आता आढाव्यात सहभागी होतो.
६. त्याला एखादी नवीन वस्तू मिळाल्यास ‘गुरुदेवांच्या कृपेने मिळाली’, असा त्याचा भाव असतो.
– सौ. प्रज्ञा सम्राट देशपांडे आणि श्री. सम्राट देशपांडे (कु. अर्जुनचे आई-वडील), पुणे (१२.७.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.