मुख्य सूत्रधार महंमद सुहैल याच्याशी निगडित १९३ कोटी रुपयांची मालमत्ता घेतली कह्यात

बनावट कागदपत्रांच्या आधारे भूमी बळकावल्याचे प्रकरण

प्रतीकात्मक छायाचित्र

पणजी, २९ एप्रिल (वार्ता.) – बनावट कागदपत्रांच्या आधारे भूमी बळकावल्याच्या प्रकरणी मुख्य सूत्रधार महंमद सुहैल उपाख्य मायकल याच्याशी निगडित असलेल्या बार्देश तालुक्यातील १९३ कोटी ४९ लाख रुपये किमतीच्या एकूण २४ मालमत्ता तात्पुरत्या कह्यात घेण्यात आल्या आहेत. यापूर्वी याच प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ३९ कोटी २४ लाख रुपये किमतीच्या एकूण ३१ मालमत्ता कह्यात घेतल्या होत्या. त्यामुळे एकूण २३२ कोटी ७३ लाख रुपये किमतीच्या मालमत्ता कह्यात घेण्यात आल्या आहेत.

बनावट कागदपत्रांच्या आधारे भूमी बळकावल्याच्या प्रकरणी अनेक तक्रारी आल्यानंतर सरकारने विशेष अन्वेषण पथकाची वर्ष २०२२ मध्ये स्थापना केली होती. त्यानतंर या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने ५१ गुन्हे नोंद करून अन्वेषणाला प्रारंभ केला आहे. या प्रकरणी आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी ‘ईडी’ने म्हापसा पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या ३ गुन्ह्यांचे प्राथमिक अन्वेषण केले होते. या प्रकरणी ‘ईडी’ने मुख्य सूत्रधार विक्रांत शेट्टी, महंमद सुहेल, राजकुमार मैथी आणि इतर यांनी बळकावलेल्या ३९ कोटी २४ लाख रुपये किमतीच्या मालमत्ता कह्यात घेतल्या होता. या मालमत्तांची बाजारात किंमत ५३५ कोटी १३ लाख ८७ सहस्र ८०० रुपयांहून अधिक असल्याचा दावा ‘ईडी’ने केला आहे. ‘ईडी’ने या प्रकरणी संशयितांसह एकूण ३६ जणांच्या विरोधात म्हापसा येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले आहे.