अक्षय्य तृतीया हा सण कसा साजरा करावा ?

१. उदकुंभाचे (उदककुंभाचे) दान 

या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे. उदककुंभालाच ‘सर्वसमावेशक स्तरावरील निर्गुण पात्र’ असे संबोधले जाते.

२. उद्देश  

अ. उदककुंभाचे दान करणे, म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश, तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल, तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदककुंभायोगे सर्व वासना पितर अन् देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे

आ. पितरांच्या चरणी उदककुंभ दान दिल्याने पितर मानवयोनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात.

इ. देवाचा कृपाशीर्वाद हा प्रारब्धजन्य सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात.

३. उदकुंभ दानाचा मंत्र

ब्राह्मणाला उदकुंभाचे दान देतांना पुढील मंत्र म्हणावा.

एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ।
अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोऽपि पितामहाः ।।

गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं कुम्भं फलान्वितम् ।
पितृभ्यः सम्प्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु ।। – धर्मसिन्धु

अर्थ : ब्रह्मा, विष्णु आणि शिव ज्यात सामावले आहेत, असा हा धर्मघट मी ब्राह्मणाला दान केला आहे. दानामुळे माझे पितर आणि देवता तृप्त होवोत. गंध, उदक, तीळ, यव, फळे यांनी युक्त असा कुंभ मी पितरांसाठी देत आहे. हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय्य (क्षय न पावणारा) ठरो.

४. शास्त्र

या दिवशी ब्रह्मांडात अखंड रूपातील, तसेच एकसमान गतीजन्यता दर्शवणार्‍या सत्त्व-रज लहरींचा प्रभाव अधिक प्रमाणात असल्याने लहरींच्या प्रवाहायोगे पितर आणि देव यांना उद्देशून ब्राह्मणाला केलेले दान पुण्यदायी ठरते. मागील जन्माच्या देवाणघेवाण हिशोबाला धरून कर्म-अकर्म करणारे ठरत असल्याने क्षय न होणार्‍या लहरींच्या साहाय्याने केलेले दान महत्त्वाचे ठरते.

– ज्योतिषी राहुल नारायणराव पुराणिक आणि ज्योतिषी आकाश नारायणराव पुराणिक, जालना

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.