२ ते ४ मे कालावधीत महाबळेश्वरला महापर्यटन उत्सव ! – शंभूराजे देसाई, पर्यटनमंत्री

श्री. शंभूराजे देसाई

मुंबई, २९ एप्रिल (वार्ता.) – महाबळेश्वर येथे महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे २ ते ४ मे या कालावधीत महापर्यटन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २ मे या दिवशी सायंकाळी ५.३० या महापर्यटन उत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांनी २९ एप्रिल या दिवशी मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली.

याविषयी अधिक माहिती देतांना शंभूराजे देसाई म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महापर्यटन उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. येथील वेण्णा येथे ३ दिवसांचा लेझर शो दाखवण्यात येणार आहे. बोटिंग असणार असून बोटीमध्ये खरेदी केंद्रांचीही व्यवस्था असणार आहे. वनविभागाकडे असलेल्या येथील प्रतासिंह उद्यानात १ सहस्र शिवकालीन पुरातन शस्त्राचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांच्या हस्ते ३ मे या दिवशी या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांच्या प्रतिकृतीही सिद्ध करण्यात येणार आहे. साहसी खेळांची प्रात्यक्षिके, भव्य सांस्कृतिक प्रदर्शन, लेझर आणि ड्रोन शो हे या पर्यटन उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. या पर्यटन उत्सवाच्या ३ दिवसांत ५० सहस्र पर्यटक येतील, असे अनुमान आहे. यासाठी १५ ते २० कोटी इतका व्यय अपेक्षित आहे.’’