हिंदुत्वनिष्ठांवरील अन्यायाविरोधात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचा आक्रोश मोर्चा

शेकडो हिंदुत्वनिष्ठांकडून मुंबई पोलिसांचा निषेध !

मोर्च्यात सहभागी असलेले विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते

मुंबई – मुंबई पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांची सातत्याने करण्यात येत असलेली गळचेपी आणि अन्याय वागणूक या विरोधात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी २९ एप्रिल या दिवशी चर्चगेट रेल्वेस्थानकाच्या बाहेर आक्रोश मोर्चा काढला. या वेळी शेकडोंच्या संख्येने जमलेल्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी मुंबई पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या मोर्च्यात महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चानंतर हिंदुत्वनिष्ठांवर अन्याय करणार्‍या पोलिसांवर कारवाई करावी यासाठी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने श्री. मोहन सालेकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

१६ फेब्रुवारी या दिवशी सांताक्रूझमधील वाकोला येथे काही धर्मांधांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते वाकोला पोलीस ठाण्यात पोचले, तेव्हा विनयभंग करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्याऐवजी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केली. १३ एप्रिल या दिवशी वडाळा येथील संगमनगर भागात श्रीरामनवमीच्या निमित्ताने काढण्यात येणार्‍या शोभायात्रेला अनुमती नाकारली. मागील १५ वर्षांपासून श्रीरामनवमीच्या दिवशी येथे शोभायात्रा काढण्यात येते. पोलिसांनी २० एप्रिल या दिवशी शोभायात्रा काढण्याची सूचना केली. पोलिसांच्या विनंतीला मान देत ‘श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती’ने ही विनंती मान्य केली; मात्र पोलिसांनी शोभायात्रेच्या २ दिवस आधी शोभायात्रेला अनुमती नाकारण्यात आल्याचे सांगितले. पोलिसांनी भगवे ध्वज, फ्लेक्स काढून टाकले, तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर शोभायात्रेच्या दिवशी लाठीमार केला. अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांची गळचेपी आणि त्यांच्यावर अन्याय मुंबई पोलिसांकडून मागील काही महिन्यांत वारंवार होत आहे. या सर्वांच्या विरोधात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी हा मोर्चा काढला होता. याविषयी विश्व हिंदु परिषदेचे कोकण प्रांताचे मंत्री श्री. मोहन सालेकर म्हणाले, ‘‘मुंबई पोलीस जनरल डायरप्रमाणे हिंदूंवर अत्याचार करत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ एकवटले आहेत.’’