श्री पतित पावन मंदिर संस्थेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आला खुलासा !

  • पतितपावन मंदिरात भजनास मज्जाव केल्याचे प्रकरण

  • माजी अध्यक्ष बाबा परुळेकर यांच्यावरील आरोपांना दिले उत्तर

रत्नागिरी – येथील पतितपावन मंदिरात भजनास मज्जाव केल्याच्या आरोपावर श्री पतितपावन मंदिर संस्थेकडून खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणी मंदिराचे माजी अध्यक्ष बाबा परुळेकर यांनी ज्येष्ठ भजनी बुवांना प्रवेश नाकारून भजनास मज्जाव केल्याचा आरोप अनेक वृत्तपत्रांतून करण्यात आला होता. याविषयी २७ एप्रिलला पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. आता मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेष विनायक शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या प्रकरणावर खुलासा दिला आहे.

मंदिर संस्थेकडून करण्यात आलेला खुलासा

पतितपावन मंदिर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने दानशूर भागोजीशेठ कीर यांनी वर्ष १९३१ मध्ये बांधलेले सर्व हिंदूंसाठी खुले मंदिर आहे. २४ मार्च २०२५ या दिवशी एकमुखी दत्त मंदिर भजन मंडळ, मठ घुडे वठार यांनी प्रति शिवरात्रीला कायमस्वरूपी भजनासाठी अनुमती मागितली; मात्र विश्वस्त मंडळाची सभा त्वरित घेणे शक्य नसल्याने २७ मार्च या दिवशी एक दिवसांच्या भजनाला मान्यता देण्यात आली, जी उत्साहात पार पडली; परंतु १० एप्रिल या दिवशी झालेल्या विश्वस्त सभेत कायमस्वरूपी भजनाला मान्यता न देण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला होता; कारण अशा कार्यक्रमांमुळे व्यवस्थापनावर ताण येईल. हा निर्णय भजन मंडळाला रजिस्टर्ड पत्राद्वारेही कळवण्यात आला आणि पोलीस ठाण्यालाही याची प्रत देण्यात आली होती.

काय आहे प्रकरण ?

२६ एप्रिलला मंदिरात अखिल हिंदु गणेशोत्सव मंडळाची सभा चालू असतांना भजनी बुवा हार्मोनियम आणि पखवाज घेऊन आले. संस्थेने भजनाला अनुमती नसल्याचे कळवले. या वेळी बाबा परुळेकर यांनी मंडळाशी संवाद साधत ‘संस्थेची या भजनाला अनुमती नाही, तसे ठरावाचे पत्रही भजनी मंडळाला पाठवले आहे’, असे सांगितले; मात्र भजन मंडळाने दादागिरी आणि अरेरावीची भाषा करत मंदिरात भजन करण्यास कोण रोखू शकते?, अशी वक्तव्ये केली आणि परुळेकर यांनी हे मंदिर आमचे म्हणजे मंदिर संस्थेच्या मालकीचे आहे, असे सांगितले. यानंतर मंडळाने विनाअनुमती भजन चालू केले, ज्यात विश्वस्तांनीही सहभाग घेतला. संस्थेने ज्येष्ठ भजनी बुवा जयवंत बोरकर यांचा या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. उन्मेष शिंदे यांनी सन्मानही केला.

संस्थेची भूमिका

संस्थेने भजन मंडळाच्या आक्षेपार्ह वर्तनावर गुन्हा नोंद करण्याचा विचार केला; परंतु हिंदु समाजाच्या एकतेच्या उद्देशाने तसे टाळले. मंदिर आणि परिसर संस्थेच्या मालकीचा असून, भागोजीशेठ कीर यांच्या वारसदारांपैकी ओमकार विवेक कीर हे सध्याचे विश्वस्त आहेत. संस्थेने अंकुर कीर यांनी मंदिरावर व्यक्तीगत मालकीचा दावा करत केलेल्या कायदेशीर प्रयत्नांचा उल्लेख करत त्यांचा हेतू जनमानस कलुषित करण्याचा असल्याचे म्हटले आहे. याविषयी सर्व इतिहास आणि वस्तूुस्थिती स्वतंत्र लेखाने लवकरच प्रसिद्ध होईल, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

मंदिरातील सर्व घटनाक्रम ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यात संग्रहित झाला आहे. संस्थेला विश्वास आहे की, पोलीस योग्य ती दखल घेतील आणि कार्यवाही करतील. भजन मंडळाने संस्थेशी संवाद साधून गैरसमज दूर करणे अपेक्षित होते; परंतु त्यांनी अधिकारशाही वर्तन केल्याचा आरोप संस्थेने केला आहे.

या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. चुकीच्या बातम्यांमुळे जनमानसांत संभ्रम पसरू नये, यासाठी हा खुलासा आवश्यक होता, असे उन्मेष शिंदे यांनी नमूद केले. मंदिर सर्व हिंदूंसाठी खुले असून, भविष्यातही तसे राहील, अशी ग्वाहीही संस्थेने दिली आहे.