बेंगळुरू (कर्नाटक) – भारत-पाकिस्तान सीमेवर आतंकवादी आक्रमणे आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन यांमुळे तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांना शौर्य आणि शक्ती प्राप्त होऊन यश मिळावे, यासाठी बेंगळुरूमधील राजाजीनगर येथील श्रीराममंदिराच्या मैदानात श्रीराम सेना आणि बजरंग दल यांच्या नेतृत्वाखाली विशेष महायज्ञ अन् शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात पेजावर मठाचे श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक आणि सहस्रो हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राम भद्रकयाग, संकल्पयाग आणि परशुरामांचा परशुची विशेष पूजा !
युद्धाच्या परिस्थितीत भारतीय सैनिकांना धैर्य आणि शक्ती मिळावी, यासाठी हिंदु संघटनांनी राम भद्रकयाग, संकल्पयाग आणि भगवान परशुरामांच्या परशुची विशेष पूजा आयोजित केली होती. या यज्ञात सैनिकांच्या कल्याणासाठी विशेष हवन आणि मंत्रोच्चारण करण्यात आले.
यज्ञाच्या माध्यमातून सैनिकांना आध्यात्मिक ऊर्जा प्रदान ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी
राममंदिराजवळील मैदानात धार्मिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सभेत बोलतांना पेजावर मठाचे श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी म्हणाले, ‘‘आपले सैनिक देशाचा गौरव आणि सुरक्षितता यांसाठी लढत आहेत. या यज्ञ आणि पूजा यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करत आहोत.’’
एकजुटीने सैनिकांना पाठिंबा देऊया ! – प्रमोद मुतालिक
श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक या वेळी म्हणाले की, पाकिस्तानच्या आतंकवादी आक्रमणांना भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत आहे. आपण सर्वांनी एकजुटीने सैनिकांना पाठिंबा देऊया.