२४० संशयित कह्यात

पणजी – काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदु पर्यटकांवर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर गोवा पोलीस संपूर्ण राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने पडताळण्या करत आहेत. उत्तर गोव्यात २५ ते २७ एप्रिल या काळात पणजी, म्हापसा, डिचोली, मोपा विमानतळ परिसर, जुने गोवे, हणजूण, पेडणे, मांद्रे, पर्वरी, कळंगुट, वाळपई आणि अन्य ठिकाणे मिळून ४ सहस्र ५०० हून अधिक भाडेकरू, २ सहस्रांहून अधिक घरकामे करणार्या व्यक्ती, १९८ अज्ञात व्यक्ती यांची पडताळणी करण्यात आली असून २४० संशयितांना कह्यात घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ३४ बेकायदेशीर फेरीवाल्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. म्हापसा आणि डिचोली परिसरांतून सर्वाधिक संशयित व्यक्ती कह्यात घेण्यात आल्या.
या वेळी पोलिसांनी असामाजिक घटकांची ठिकाणे शोधली, तसेच उपाहारगृहे, हॉटेल्स, गेस्ट हाऊस, भाडेकरू आणि परदेशी नागरिक यांची पडताळणी केली. परदेशी नागरिकांवर ‘सी फॉर्म’ भरण्याची कारवाईही करण्यात आली. उत्तर गोव्यातील सुरक्षेच्या दृष्टीने ही विशेष मोहीम राबवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दक्षिण गोव्यातही कारवाई
दक्षिण गोव्यातील २ सहस्र ५१५ भाडेकरू आणि अन्य ४३३ व्यक्ती यांची पडताळणी करण्यात आली. या वेळी पोलिसांनी १७१ व्यक्तींना कह्यात घेतले. कारवाईच्या वेळी मुख्यतः मंगोर हिल्स, न्यू वाडे आणि बोगमालो समुद्रकिनारा या भागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
सागरी सुरक्षाही वाढवली
गोव्याच्या १०५ किलोमीटरच्या सागरी किनारपट्टीवर बायणा ते बागा, तेरेखोल ते बागा आणि बायणा ते पोळे या ३ भागांमध्ये गस्त घालण्यात येत आहे.
सायबर पातळीवरही खबरदारी
सामाजिक माध्यमे देखरेख गटाच्या वतीने २४ घंटे सामाजिक माध्यमांवरील लिखाणावर लक्ष ठेवण्यात येत आहे. उत्तेजक किंवा भडकावू लिखाण आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जात आहे. आक्षेपार्ह किंवा अफवा पसरवणार्या लिखाणावर केंद्र सरकारने विकसित केलेल्या ‘सुदर्शन ॲप’च्या साहाय्याने देखरेख ठेवली जात आहे