
१. ‘२२.५.२०२२ या दिवशी रथोत्सवाचा सोहळा आरंभ होण्याची आतुरतेने वाट पहात आम्ही सर्व साधक रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील एका कक्षात जमलो होतो. त्या वेळी मला आतून पुष्कळ शांत वाटत होते. मी माझे डोळे बंद केले. तेव्हा माझा कृतज्ञताभाव दाटून आला.
२. या सोहळ्याच्या सिद्धतेसाठी साधकांनी केलेले कष्ट मी प्रत्यक्ष पाहिले होते. आताही ‘अनेक देवता, ऋषिमुनी आणि उच्च लोकांतील जीव या रथोत्सवाची सिद्धता करत आहेत आणि प्रत्यक्ष सोहळा चालू होण्याची ते वाट पहात आहेत’, असे मला जाणवत होते. त्या वेळी ‘दुधाप्रमाणे भासणारा दैवी शुभ्र प्रकाश उच्च लोकांतून सर्वत्र प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
३. रथोत्सवाला आरंभ झाल्यावर आम्ही रामनाथी मंदिरानजीक पोचलो. तेव्हा मला आतून ‘जय श्रीराम’ हा शब्द ऐकू आला. त्या वेळी ‘प्रत्यक्ष श्रीराम स्वतःचे परिवारजन आणि सैन्य यांसह या रथोत्सवात सहभागी होण्यासाठी उभे आहेत, तसेच श्री हनुमानाने धर्मध्वजाचे रक्षण करण्यासाठी विराट रूप धारण केले आहे’, असे मला जाणवले.
४. त्याच वेळी मला स्मितहास्य करणारे परात्पर गुरु डॉक्टरांचे विराट रूप दिसले. त्यांनी आम्हा सर्वांना मिठीत घेतले. सर्वत्र चैतन्य पसरले होते. परात्पर गुरुदेवांच्या प्रत्येक श्वासोच्छ्वासातून रथोत्सवाला गती मिळत होती. ‘रथोत्सवातील साधक जे काही अनुभवत आहेत, ते इतर लोकांतील जिवांनाही अनुभवता यावे’, यासाठी परात्पर गुरुदेवांचा श्वासोच्छ्वास विविध लोकांत प्रवाहित होत आहे’, असे मला जाणवले.
५. मी रथारूढ परात्पर गुरुदेव आणि त्यांच्यासमवेत विराजमान असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहिले. तेव्हा ‘हे दैवी दृश्य पहाण्यासाठी माझे दोन डोळे असमर्थ आहेत’, असे मला वाटले.
६. त्याच वेळी ‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ रथाच्या मागे शेषनागाच्या रूपात आणि त्यांच्या समवेत सनातनचे इतर संत विविध देवीदेवतांच्या रूपात उभे आहेत’, असे मला दिसले.
हे श्री गुरुदेव, आपल्या ज्ञानरूपी सूर्याच्या प्रकाशाने साधकांतील अज्ञानरूपी अंधकार दूर होईल आणि आम्ही साधक सदैव विजयी असू’, याविषयी आम्ही आश्वस्त झालो आहोत.’
– एक साधक, फोंडा, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |