युवा साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा लाभलेला अनमोल सत्संग आणि या सत्संगात प.पू. गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन !

मध्यंतरी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रसारातील युवा साधकांचे शिबिर झाले. त्या वेळी युवा साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. या सत्संगात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी  ६८ टक्के) हेही उपस्थित होते. सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा काही भाग आपण २७ एप्रिल २०२५ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग येथे दिला आहे.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/907807.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

६. युवा साधकांना साधनेत साहाय्य करणारे आदर्श माता-पिता !

६ अ. ‘साधना तळमळीने आणि भावपूर्ण केली, तर आमचे अन् तुझे जीवन सफल होणार आहे’, असे आई-वडिलांनी मुलाला सांगणे

श्री. चेतन राजहंस : श्री. अथर्व सावंत हा इंदूर, मध्यप्रदेशातून आला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आमचे गुरुदेव प.पू. भक्तराज महाराज यांचा ‘भक्तवात्सल्याश्रम’ इंदूरमध्येच आहे.

श्री. अथर्व सावंत (इंदूर, मध्यप्रदेश) : हो. त्या आश्रमाच्या जवळच माझे घर, म्हणजे आपला आश्रम आहे.

श्री. चेतन राजहंस : अथर्व तेथे सामाजिक माध्यमाची (‘सोशल मिडिया’ची) सेवा करतो. तो ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ सेवेत सहभागी झाला होता. वर्ष २०२१ मध्ये हरिद्वार येथील कुंभमेळ्यातही तो सेवेला आला होता.

श्री. अथर्व सावंत : परम पूज्य, मला घरच्यांचा कोणताही विरोध नाही. आई-बाबा मला पूर्वीपासूनच म्हणतात, ‘‘तू शिक्षण सोडून दे आणि केवळ साधनाच कर.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले : किती चांगले आहे ना ! समाजात याच्या अगदी उलट असते. बाकीचे आई-वडील मुलांना साधना करायला विरोध करतात.

श्री. अथर्व सावंत : मला पहिल्यापासूनच शिक्षणाची विशेष आवड नव्हती. माझे आई-बाबा म्हणतात, ‘तू तळमळीने आणि भावपूर्ण रितीने साधना कर. तू एवढे केलेस, तरी आमच्यासाठी पुष्कळ आहे. आमचे जीवन सफल झाले आहे. तुझेही जीवन सफल होईल.’’ असे सांगून ते माझ्याकडून सेवा करून घेतात. मी साधनेसाठी काही केले किंवा सेवेसाठी मला कुठे जायचे असेल, तर ते मला मुळीच अडवत नाहीत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हे असे पहिलेच उदाहरण आहे ना ! ते कलियुगातील आदर्श आई-वडील आहेत.

श्री. अथर्व सावंत : आईला सेवेला जाण्याविषयी एकदा जरी विचारले, तर ती ‘सेवेसाठी जायचे आहे ना ? मग लवकर जा’, असे मला म्हणते. हरिद्वार येथील कुंभमेळ्यासाठी सेवेला जातांना इंदूरमध्ये कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी लागू झाली होती; परंतु हरिद्वारला कुंभमेळा चालू झाला होता. तेव्हा मी आईला सहज विचारले की, ‘हरिद्वारमध्ये कुंभमेळा चालू आहे, तर मी तिकडे जाऊ का ?’ मला वाटले नव्हते की, ती होकार देईल; परंतु तिच्या रूपात आपणच ‘हो’ म्हणून मला सेवेला बोलावून घेतले.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हे ऐकून मला पुष्कळ चांगले वाटले. नाही तर बाकीच्या लोकांची सतत तक्रार असते. तू मला पुष्कळ चांगली बातमी ऐकवलीस.

६ आ. कन्येला शालेय शिक्षणापेक्षा साधनेचे प्रयत्न करायला प्रोत्साहन देणारे साधक आई-वडील ! 

कु. समृद्धी धुळाज (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय २३ वर्ष, गहहिंग्लज, कोल्हापूर, महाराष्ट्र) : माझे आई-बाबासुद्धा असेच म्हणतात की, ‘तू अभ्यास नंतर कर; परंतु व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितलेला नामजप आणि अन्य सूत्रे प्रथम पूर्ण कर.’ आधीपासूनच ते मला असे सांगत आहेत. ते मला स्वभावदोष सारणीतील सर्व सूत्रे लिहिण्यासाठीही साहाय्य करतात.

कु. अवंती उरकुडे (चंद्रपूर, महाराष्ट्र) : माझे आई-बाबाही असे सांगतात की, ‘तू साधना कर. आश्रमात जाऊन रहा.’

परात्पर गुरु डॉ. आठवले : किती चांगले आई-वडील मिळाले आहेत !

कु. अवंती उरकुडे : घरातील सर्वजण साधनेवाठी एकमेकांना साहाय्य करतात. कुणाची काही चूक झाली, तर माझा भाऊ किंवा आई-बाबा सांगतात, ‘….अशी चूक झाली आहे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले : पुष्कळ छान ! तुझी साधनेत लवकर प्रगती होईल. घरात कुणाचा विरोध असेल, तर आपला वेळ वाया जातो आणि मनाला त्रास होतो. घरातील सदस्य साधनेसाठी एकमेकांना साहाय्य करणारे असले, तर याचा अर्थ होतो की, आपली पूर्वपुण्याई चांगली आहे. मागील जन्मी आपण चांगली साधना केली आहे. त्यामुळे असे चांगले आई-वडील मिळाले आहेत. माझ्या आई-वडिलांविषयी तुम्ही ‘सनातन प्रभात’मध्ये वाचले असेल. असे माता-पिता (प.पू. बाळाजी आठवले आणि पू. (सौ.) नलिनी आठवले) मिळाल्यामुळे मी सर्व सोडून साधनेत आलो. मी ७ वर्षे इंग्लंडमध्ये होतो. मला तेथील सुखलोलुप जीवन नकोसे झाले.

कु. अवंती उरकुडे : गुरुदेव, आता तुम्हीच मला आपल्या चरणी घ्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले : आताच आली आहेस आणि किती पुढचा विचार करते आहेस ? आश्रमात प्रतिदिन नवीन काहीतरी शिकायला मिळते. घरात एवढे शिकायला मिळत नाही. लवकर शिकून नंतर सर्वांना शिकवायचे आहे तुला.

(क्रमशः)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/908597.html