एस्.टी. महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढण्याचे परिवहनमंत्र्यांचे निर्देश !

एस्.टी. महामंडळ

मुंबई – आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजनासाठी, एस्.टी. महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एस्.टी. महामंडळ प्रशासनाला दिले आहेत. २८ एप्रिल या दिवशी मुंबई सेंटर येथील एस्.टी.च्या मुख्यालयात एस्.टी. महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत परिवहनमंत्र्यांनी वरील निर्देश दिले. या बैठकीला एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.

या वेळी प्रताप सरनाईक म्हणाले, ‘‘१० सहस्र कोटी रुपये संचित तोटा सहन करणार्‍या एस्.टी. महामंडळाला कर्मचार्‍यांचे वेतन, वाहन खरेदी, टायर खरेदी, इंधन खरेदी, स्थानकाचे नूतनीकरण आणि अन्य व्यय यांसाठी नियमित आर्थिक कसरत करावी लागते. कर्मचार्‍यांचे देणी, भविष्य निर्वाह निधीचे हप्ते, कामगार करारातील प्रलंबित देणी यांसाठी महामंडळाला पैशाची आवश्यकता आहे. इंधन, वस्तू आणि सेवा पुरवणार्‍या संस्थांची थकीत देणी या सर्व घटकांचा विचार करून एस्.टी. महामंडळाला सध्या किती उत्पन्न मिळते ? किती व्यय येतो ? तसेच किती देणी शिल्लक आहेत. या सर्वांचा लेखा-जोखा मांडणारी श्वेतपत्रिका काढणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून एक आर्थिक शिस्त निर्माण करणे आवश्यक आहे.’’

कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर सर्व कर्मचार्‍यांना एकाच छताखाली वैद्यकीय सेवा सुविधा आणि वैद्यकीय चाचण्या करून मिळतील अशी ‘कॅशलेस मेडिक्लेम’ योजना धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने चालू करण्याचे निर्देश प्रताप सरनाईक यांनी एस्.टी. प्रशासनाला या वेळी दिले. एस्.टी. महामंडळ प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी बांधकाम, वाहतूक, कामगार, आर्थिक आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांतील प्रत्येकी एक तज्ञ असलेल्या व्यक्तींची समिती स्थापन करण्याचे निर्देशही या वेळी प्रताप सरनाईक यांनी दिले.

बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रकरणाची चौकशी होणार !

‘नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला आश्वासित केल्याप्रमाणे १ सहस्र ३१० बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या एकूण प्रकरणाचे अन्वेषण तटस्थ व्यक्तीद्वारे केले जाईल. याविषयी परिवहन अतिरिक्त मुख्य सचिव यांना सूचना देण्यात येईल’, असे प्रताप सरनाईक म्हणाले.