‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने…
‘दाभोलकर हत्या आणि मी’ या श्री. विक्रम भावे लिखित पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे झाले. त्या निमित्ताने या पुस्तकातील लिखाण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

१. दाभोलकर हत्येच्या घटनेनंतर काही मिनिटांत मुख्यमंत्र्यांनीच अन्वेषणाची दिशा निश्चित करणे
२० ऑगस्ट २०१३ या दिवशी पुण्यात अंनिसच्या डॉ. दाभोलकरांची हत्या झाली. त्यानंतर काही मिनिटांच्या आतच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘या हत्येमागे हिंदुत्वनिष्ठांचा हात आहे’, असे विधान केले आणि अन्वेषणाची दिशा ठरवली. खरे तर कुठलीही हत्या झाली की, पोलीस भाऊबंदकीचा वाद, मालमत्तेचा वाद, अंडरवर्ल्डशी संबंध, गुन्हेगारीशी संबंध, बाईची भानगड अशा अनेक शक्यता पडताळून घेतात. दाभोलकरांच्या हत्येनंतर अशा शक्यतांचे अन्वेषणच काय; पण साधा ‘एफ्.आय.आर्.’ही (प्रथमदर्शी अहवालही) नोंद झाला नव्हता, तोच थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच असे विधान करून एका अर्थाने पुढील अन्वेषणाची दिशाच ठरवली होती.
२. हिंदू किंवा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा हात असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा पुणे पोलिसांचा दावा !
दाभोलकर हत्येचे अन्वेषण सीबीआयकडे द्यावे, यासाठी केतन तिरोडकर नामक पत्रकाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेत न्यायालयाने पुणे पोलिसांनाही त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्या वेळी पुणे पोलिसांनी न्यायालयास सांगितले होते, ‘दाभोलकरांच्या हत्येच्या प्रकरणात हिंदू किंवा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा हात असल्याचा कोणताही पुरावा नाही.’
३. शस्त्र तस्करांकडून जप्त केलेल्या शस्त्रातून हत्या झाल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून उघड
दाभोलकरांच्या हत्या झाल्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोन शस्त्र तस्कर तरुणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आले. या चाचणीतून स्पष्ट झाले, ‘दाभोलकरांची हत्या नागोरी आणि खंडेलवाल यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलातूनच झाली होती.’ त्यामुळे पुणे गुन्हे शाखेचे तत्कालीन अधिकारी राजेंद्र भामरे यांनी न्यायालयास शपथेवर सांगितले होते, ‘नागोरी आणि खंडेलवाल यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने त्यांच्यावर आणखी काही कलमे लावण्याची अनुमती द्यावी.’
४. नागोरी आणि खंडेलवाल यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट होऊ न शकल्याने त्यांना ‘डिफॉल्ट’ जामीन मिळणे
नागोरी आणि खंडेलवाल यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याचे पुणे पोलीस शपथेवर सांगत होते; मात्र पुढील ९० दिवसांत असे काय घडले की, नागोरी आणि खंडेलवाल यांच्या विरोधात साधे आरोपपत्रही प्रविष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे नागोरी आणि खंडेलवाल यांना ‘डिफॉल्ट’ (आरोपीला जामीन मिळण्याचा अधिकार) जामीन मिळाला. ‘सबळ पुरावे’ ते ‘आरोपपत्र प्रविष्ट न झाल्याने ‘डिफॉल्ट’ जामीन’ हा ९० दिवसांतील प्रवास थक्क करणारा आहे.

५. नागोरी आणि खंडेलवाल यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे आमीष
नागोरी आणि खंडेलवाल यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्या वेळी त्यांनी न्यायालयातच आरडाओरडा केला. ‘गुन्हा मान्य करण्यासाठी आम्हाला प्रत्येकी २५ लाख रुपयांचे आमीष राकेश मारिया (आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख) दाखवत आहेत; परंतु आमचा या हत्येशी काहीही संबंध नाही’, असा आरोपही नागोरी आणि खंडेलवाल यांनी केला. आपल्याकडे अशा गोष्टी न्यायालयाच्या रेकॉर्डला (नोंदींमध्ये) कधीच येत नाहीत; मात्र त्याच्या बातम्या माध्यमांत जोरदार प्रसिद्ध झाल्या. साहजिकच पुढील सुनावणीच्या वेळी नागोरी आणि खंडेलवाल यांनी हात जोडून न्यायालयाला सांगितले, ‘मागील सुनावणीच्या वेळी आम्ही जे काही बोललो, ते गैरसमजातून होते.’
६. विक्रम भावे यांना अटक करण्यासाठी रचण्यात आलेले षड्यंत्र
माझ्या ‘मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य हात’ या पुस्तकाचे प्रकाशन १ सप्टेंबर २०१३ या दिवशी झाले. त्यानंतर ११ सप्टेंबर २०१३ या दिवशी दैनिक ‘नवाकाळ’ने माझ्या पुस्तकातील एक संपूर्ण प्रकरण जसेच्या तसे छापले. त्याच दिवशी सायंकाळी काही जण पनवेल येथील सनातनच्या आश्रमात मला शोधत आले. त्यांनी सांगितले, ‘आम्ही पुणे क्राईम ब्रँचकडून दाभोलकर हत्येच्या प्रकरणात विक्रम भावे यांची चौकशी करण्यासाठी आलो आहोत.’ आश्रमातील साधकांनी त्या लोकांना त्यांची ओळखपत्रे विचारली असता त्यांनी पिस्तुले काढून दाखवली आणि ‘हेच आमचे ओळखपत्र’ असे सांगितले. स्वत:ची खरी नावे न सांगता खोटी आणि घाणेरडी नावे सांगितली. आश्रमातील साधकांनी त्यांची छायाचित्रे काढली, तसेच पुणे क्राईम ब्रँचला दूरभाष करून त्या लोकांविषयी चौकशी केली. तेव्हा समजले की, पुणे क्राईम ब्रँचचे कोणतेही अधिकारी या प्रकरणाच्या चौकशीसाठी कुठेही गेलेले नाहीत. मग मात्र आश्रमातील साधकांना या प्रकरणाचा संशय येऊ लागला. त्या व्यक्ती ज्या गाडीतून आल्या होत्या, त्या गाडीची माहिती इंटरनेटवर शोधली असता असे लक्षात आले की, ती गाडी आतंकवादविरोधी पथकाचे अधिकारी राजन घुले यांच्या नावावर होती आणि ती चोरीला गेली होती.
आतंकवादविरोधी पथकाचे अधिकारी राजन घुले हेच मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील अन्वेषण अधिकारी होते. त्यांची न्यायालयासमोर अन्वेषण अधिकारी म्हणून साक्षही नोंदवण्यात आली होती. त्यात ते हे मान्य करतात की, पनवेल येथील आश्रमात पोलीस म्हणून गेलेल्या व्यक्ती जी गाडी घेऊन गेल्या होत्या, ती गाडी घुले यांचीच होती. पनवेल येथील आश्रमात पुणे क्राईम ब्रँचचे म्हणून गेलेले अधिकारी हे मुंबईच्या आतंकवादविरोधी पथकाचे अधिकारी होते अन् त्यात रविंद्र डोईफोडे हा या पथकाचा अधिकारीही होता, हेही समोर आले. मी त्या वेळी अलिबाग येथील न्यायालयात गेलो होतो. त्यामुळे मी तेथे पोलिसांना सापडलो नाही आणि म्हणून मी वाचलो.
पुढे राकेश मारिया यांनी ‘लेट मी टेल द ट्रूथ’ या पुस्तकात हे मान्य केले आहे, ‘आम्ही सनातनच्या आश्रमापर्यंत पोचलो होतो आणि कारवाई होणार होतीच; पण काही कारणांनी ते फिसकटले.’ ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतही मारिया हे मान्य करतात.
आज या सगळ्या गोष्टींचा एकत्रित अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते, ‘नागोरी आणि खंडेलवाल यांना राकेश मारिया जे प्रत्येकी २५ लाख रुपयांचे आमीष दाखवत होते, ते त्या दोघांनी गुन्हा केल्याचे मान्य करावे, यासाठी नसून त्यांनी ‘विक्रम भावे याला शस्त्र दिल्याचे न्यायालयासमोर सांगावे आणि त्याने त्या शस्त्रातून दाभोलकरांची हत्या केल्याचे सांगावे अन् माफीचे साक्षीदार व्हावे’, यासाठी आमीष दिले जात होते.’ ‘एन्काऊंटर फेम’ (चकमकीसाठी प्रसिद्ध) अधिकार्यांची ‘मोड्स ऑपरेंडी’ (एक कार्यप्रणाली) पहाता जर मी त्या दिवशी आश्रमात सापडलो असतो, तर त्या रात्री माझा ‘एन्काऊंटर’ झाला असता किंवा पुढील वर्षभरात मला फासावर लटकवण्यात आले असते. हे केवळ मी हिंदुत्वनिष्ठ आणि ब्राह्मण आहे म्हणून. तत्कालीन हिंदुद्वेषी गृहमंत्री आबा पाटलांचाही यात काही सहभाग आहे का ? हा वेगळ्या अन्वेषणाचा विषय आहे.
‘ब्राह्मण आणि हिंदुत्ववादी असणे, हा इतका मोठा अपराध असेल’, असे मला वाटले नव्हते; पण अर्थातच ‘हिंदुत्ववादी असणे, हा अपराध असेल, तर प्रतिदिनच मी तो करणारच’, हे मारियासारख्या सत्तेच्या दलालांनी लक्षात ठेवावे.
– श्री. विक्रम भावे, वरसई, तालुका पेण, जिल्हा रायगड.
(साभार : ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकातून)
हे पुस्तक लवकरच ‘ॲमेझॉन किंडल’वर उपलब्ध होणार आहे, याची नोंद वाचक आणि जिज्ञासू यांनी घ्यावी.