शिवसेनेचे देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर यांची चेतावणी

देवगड, २७ एप्रिल – देवगड-जामसंडे नगरपंचायत क्षेत्रातील पंतप्रधान घरकूल आवास योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, यासाठी शिवसेनेचे देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी १ मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची चेतावणी दिली आहे.
केंद्र सरकारच्या एस्.के. खंडेलवाल समितीने या बांधकामाविषयी दिलेल्या अहवालातून निकृष्ट दर्जाचे बांधकाम, नियमांचे उल्लंघन आणि इतर गैरव्यवहार उघडकीस आले होते. योजनेतील कारभारावर समितीने ताशेरे ओढून ९२ लाख रुपये दंड भरण्याचे आणि ठेकेदार पालटून नव्याने बांधकाम करण्याचे निर्देश दिले होते; मात्र प्रशासनाने या निर्देशांचे पालन न करता त्याच ठेकेदाराला काम पुढे चालू ठेवण्याची अनुमती दिली. त्यामुळे खंडेलवाल समितीने दाखवलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत काम बंद ठेवावे आणि या गैरकारभाराची चौकशी व्हावी, या मागणीकडे नगरपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने १ मे या दिवशी उपोषण करणार असल्याचे साळसकर यांनी सांगितले.