६ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा

पुणे – बोपदेव घाटामध्ये महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना ६ महिन्यांपूर्वी घडली होती. त्यातील मुख्य सूत्रधार सूरज उपाख्य बापू गोसावी याला वालचंदनगर परिसरातून अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर हा आरोपी पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला पकडले. बोपदेव घाटामध्ये ३ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री महाविद्यालयीन तरुणी मित्रासोबत फिरायला गेली होती.
घाटातील ‘टेबल पॉईंट’ परिसरात कोयत्याचा धाक दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. गोसावीच्या मागावर पोलिसांची पथके होती. तो ओळख लपवून वास्तव्य करत होता. त्यामुळे त्याला अटक करण्यास अडचणी येत होत्या; परंतु गोसावी याची माहिती वालचंदनगर पोलिसांना मिळाली. त्यावरून सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.