नाशिकमधील पंड्या रुग्णालयातील गैरकारभारांची होणार विभागीय चौकशी !

मुंबई, २७ एप्रिल (वार्ता.) – अवैध गर्भपात, महिला आणि अर्भकाचा मृत्यू, आयुक्तांकडे अहवाल सादर न करणे या गैरकारभारांप्रकरणी नाशिकमधील पंड्या रुग्णालयाच्या विभागीय चौकशीचा आदेश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला. शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी रुग्णालयातील गैरकारभाराविषयी विधान परिषदेत आवाज उठवला होता.
डॉ. मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पंड्या रुग्णालयातील डॉ. चव्हाण आणि डॉ. शेटे यांचे तात्काळ स्थानांतर आणि गैरकारभाराच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. पंड्या रुग्णालय विना परवाना चालू असल्याविषयी आणि त्याकडे नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांनी दुर्लक्ष करणे यांविषयीही या समितीकडून चौकशी केली जाणार आहे. आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांची ही चौकशी समिती आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याविषयीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.