
मुंबई – वेगवेगळ्या महानगरांमध्ये महापालिका, राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे, मेट्रो आदी वाहतुकीच्या सेवा आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्रीकरण आवश्यक आहे. यासाठी महानगरांमध्ये एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण (‘युनिफाईड मेट्रोपॅलिटीन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी’) आवश्यक आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन विभाग, बेस्ट, ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास यांचे अधिकारी उपस्थित होते. २५ एप्रिल या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक झाली. या बैठकीत अधिकार्यांना सूचना करतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध वाहतूक सेवांचे तिकिट एकाच ठिकाणी असणे सोयीचे होईल. प्राधिकरणाचे कामकाज योग्य प्रकारे होण्यासाठी ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ हे स्वतंत्र पद असावे. यामध्ये राज्य आणि केंद्र शासन यांचे कायदे आणि विविध नियम यांवर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. या सर्व वाहतूक व्यवस्थांचे प्रकल्प गतीने पूर्ण होण्यासाठी एकच नियामक यंत्रणा असावी. यासाठी हे प्राधिकरण महत्त्वाची भूमिका बजावेल. या प्राधिकरणामध्ये महापौर आणि आयुक्त यांचा समावेश असावा. परिवहन सेवा सुरळीत आणि सहज उपलब्ध होण्यासाठी प्राधिकरण नियोजन करेल. या प्राधिकरणांतर्गत कार्यकारी समिती असावी. भविष्यात या प्राधिकरणाच्या विस्ताराच्या वेळी ही समिती शासनाला सल्लागार म्हणूनही काम करील.’’