|
बुलढाणा – महाराष्ट्र पोलिसांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर संतप्त झाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना कडक शब्दात समज द्यावी, अशी तंबी दिल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याविषयी आमदार संजय गायकवाड म्हणाले की, गुन्हा नोंद झाला आहे, तर त्याला मी सामोरा जाईन. मी केलेल्या वक्तव्यात महाराष्ट्र पोलिसांचा चुकून उल्लेख झाला आहे. मला स्थानिक पोलिसांविषयी बोलायचे होते. महाराष्ट्र पोलिसांचे धाडस आणि कर्तृत्व विसरता येणार नाही. ज्या चांगल्या अधिकार्यांना माझ्या वक्तव्याविषयी मनस्ताप झाला असेल, त्यांची मी क्षमायाचना करतो; मात्र काही लोकांमुळे पोलीस अपकीर्त झाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांविषयी बोललेले शब्द मी मागे घेत आहे.
आमदार संजय गायकवाड पोलिसांविषयी काय म्हणाले होते ?
माझ्या मुलाला आलेल्या धमकीप्रकरणी पोलीस काहीही करू शकत नाहीत. माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली, कुठलेही अन्वेषण झाले नाही. त्यामुळे पोलीस अकार्यक्षम असून बुलढाणा येथील २ पोलीस हे चोरांचे सरदार आहेत. चोरीचा माल पोलिसांच्या घरात आढळतोच कसा ?’, असा प्रश्नही आमदार गायकवाड यांनी उपस्थित केला होता. |