रत्नागिरी – छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे आणि ऐतिहासिक होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे स्मारक भव्य दिव्य होण्याकरता पुरातत्व आणि बांधकाम विभाग यांनी अजून अन्य ठिकाणी असलेल्या प्रकल्पाचा अभ्यास करावा आणि या स्मारकात भव्यता कशी आणता येईल ? हे पहावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
संगमेश्वर तालुक्यातील कर्णेश्वर मंदिर, कसबा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी स्मारक जतन, संर्वधन आणि परिसर विकास अनुषंगाने बैठकीत आढावा घेतला. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार प्रमोद जठार, शासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी उपमुख्यमंत्री पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसराची आणि सरदेसाई वाड्याची पहाणी करण्यात आली. या वेळी म्युझियम, ब्रिज कम बंधारा, व्हीगॅलरी, येथील नदीला येणारे पाणी, जुन्या मंदिरांचे जतन आदी विषयांवर वास्तूविशारद यांच्या समवेत चर्चा केली.
उपमुख्यमंत्री पवार यांनी नंतर कर्णेश्वर मंदिरात दर्शन घेतले आणि छत्रपती संभाजी स्मारक जतन, संर्वधन आणि परिसर विकास बैठकीत आढावा घेतला. या बैठकीच्या प्रारंभी पहलगाम येथे आतंकवादी आक्रमणात मरण पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज स्मारक जतन, संर्वधन आणि परिसर विकासाच्या अनुषंगाने पुरातत्व विभागाचे स्थापत्य अभियंता इंद्रजीत नागेश्वर यांनी सादरीकरण केले.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले,
१. सर्वांना समवेत घेऊन प्रकल्प पुढे न्यायचा आहे. स्थानिकांच्या भावना जराही दुखावणार नाहीत, याची काळजी घेऊन त्यांच्या सहमतीने स्मारक उभे करायचे आहे. ज्याची जागा जाईल, त्यांना योग्य तो मोबदला देऊ.
२. कर्णेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे काम आजही उत्तम दर्जाचे आहे. मंदिरांचे पावित्र टिकविले पाहिजे. महाराजांच्या स्मारकाच्या ५ एकर क्षेत्रामधील नदीच्या काठावरील मंदिरांचेही जतन केले जाणार आहे.
३. छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या माध्यमातून भरघोस निधी देऊ. राष्ट्रीय पातळीचे स्मारक करतांना ‘हेरिटेज टच’ देऊन येथील हवामानाला अनुकूल असे टिकाऊ बनवूया.
४. ३० जूनला पावसाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात स्मारकासाठीच्या निधीला संमती द्यायची आहे.