
पुणे – हवेली आणि मुळशी तालुक्यात एकाच वेळी ३ ठिकाणी अनधिकृत विज्ञापन फलकांवर (होर्डिंग्ज) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पी.एम्.आर्.डी.ए.) कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे १० विज्ञापनफलक धारकांनी प्राधिकरणाकडे ४८ लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे. विज्ञापनफलक धारक आणि विज्ञापन आस्थापने यांनी प्राधिकरणाकडे अंतिम चलने भरण्यास प्रारंभ केला आहे.
प्राधिकरणक्षेत्रात अवकाळी पाऊस, वादळी वारे आदींमुळे विज्ञापनफलकांमुळे धोका निर्माण होतो. त्यामुळे कारवाईचा निर्णय घेण्यात आला. वडकी, मुळशी तालुक्यांतील हिंजवडी येथून कारवाईस प्रारंभ केला आहे. वर्दळीच्या आणि रहदारीच्या ठिकाणाचे धोकादायक, मर्यादेपेक्षा अधिक उंचीचे, दुबार सरंचना विज्ञापनफलक काढून घ्यावेत, असे आवाहन सहआयुक्त दिप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी केले.