(स्टेटस : म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांच्या स्वतःच्या खात्यावर प्रसारित केलेले चित्र किंवा लिखाण)

सावंतवाडी – व्हॉट्सॲपवर धर्मांध आतंकवाद्यांशी हिंदूंची तुलना करणारा स्टेटस ठेवणार्या बांदा शहरातील एका धर्मांध शिक्षिकेच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. अशा प्रकारे स्टेटस ठेवून हिंदु नागरिकांना आतंकवादी म्हणून आणि हिंदु धर्मियांच्या श्रद्धांचा अवमान करून हिंदु अन् मुसलमान धर्मियांत तेढ निर्माण होईल, असे कृत्य केल्याने त्या शिक्षिकेच्या विरोधात नीलेश मधुकर सावंत यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी २६ एप्रिलला प्रथमदर्शनी अहवाल नोंद केला आहे.
सावंत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुस्लिमवाडी, बांदा येथील श्रीमती तबस्सूम उपाख्य तबू आगा यांनी त्यांच्या व्हॉटस्ॲपच्या स्टेटसवर पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या अनुषंगाने एक छायाचित्र ठेवले होते. त्या छायाचित्राच्या खाली ‘नाम पुछकर हिंदुओ पर गोली चलाना या नाम पुछकर मुसलमानोंसे ‘जय श्रीराम’ बुलवाना दोनों आतंकवाद है, कोई अंतर नही. जाहीलो का कोई धर्म नही होता’, असे लिहिले होते. पहलगाम येथे आतंकवाद्यांनी हिंदु धर्माविषयी विचारणा करून नंतर निष्पाप भारतीय नागरिकांवर गोळीबार करून त्यांची क्रूरपणे हत्या केली. अशा प्रकारे हत्या करणारे आतंकवादी आणि जबरदस्तीने (बलपूर्वक) ‘जय श्रीराम’ म्हणण्यास लावणारेही आतंकवादी, अशी एकमेकांशी तुलना करून, असे कृत्य करणारे दोघेही अज्ञानी (जाहील) असतात, असे लिहिलेले दिसून येते. या स्टेटसमुळे ‘जय श्रीराम’ म्हणण्यास लावणार्या हिंदु नागरिकांना आतंकवादी म्हणून आम्हा हिंदु धर्मियांच्या श्रद्धांचा अवमान करून आणि आमच्या भावना दुखावून हिंदु आणि मुसलमान या धर्मियांत तेढ निर्माण होईल, असे कृत्य केले आहे.