मडगाव येथील मालभाट परिसरात अनधिकृत झोपडपट्ट्या

  • भाडेकरूंची पडताळणी करतांना लागला शोध   

  • झोपडपट्टी पाडण्याची पोलिसांची प्रशासनाकडे मागणी 

 

प्रतीकात्मक छायाचित्र

मडगाव – दक्षिण गोव्यातील पोलिसांनी भाडेकरू पडताळणी मोहीम राबवतांना मडगाव येथील मालभाट परिसरातील झोपडपट्टीची पहाणी केली असता तेथे अवैधरित्या झोपड्या उभारून भाडेकरू रहात असल्याचे दिसून आले. या वेळी आरोग्य खात्यासह वीज खात्याच्या अधिकार्‍यांनाही बोलावून पहाणी करण्यात आली. त्यानंतर मडगाव पोलिसांनी प्रशासनाकडे ही अनधिकृत झोपडपट्टी पाडण्याची मागणी  केली आहे.

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गोव्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रहाणार्‍या भाडेकरूंची पडताळणी करण्यात प्रारंभ करण्यात आला आहे. यानुसार अनधिकृतरित्या कुणी रहात असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. मालभाट येथे झोपडपट्टीतील पडताळणी केली असता बहुतांश जणांनी भाडेकरू म्हणून अर्ज भरले असले, तरी संबंधित व्यक्ती कामावर गेल्याचे सांगण्यात आले. जागेच्या मालकाने तात्पुरती झोपडपट्टी उभारून सर्वांना वीज आणि पाणी यांची जोडणी दिलेली आहे, असे पोलिसांना आढळले.

या वेळी आरोग्य खात्याचे अधिकारी, वीज खात्याचे अधिकारी यांच्यासह पालिका निरीक्षकांना बोलावण्यात आले. वीज खात्याच्या कर्मचार्‍यांनी सर्व परिस्थिती पाहून वीजजोडणी बंद केली. पाणी जोडणीची पडताळणी चालू असून तीही तोडण्यात येणार आहे. जागेच्या मालकाला ‘भाडेकरूंना जागा रिकामी करण्यास सांगावे’, अशी सूचना देण्यात आली आहे. यापूर्वी एका प्रकरणात उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामे पाडण्याचे निर्देश पालिका आणि पंचायती यांना दिलेले आहेत. त्यानुसार लवकरच मडगाव नगरपालिकेचे प्रशासन अहवाल सादर करेल. या वस्तीतील लोक रात्रीच्या वेळी रस्त्यावरील लोकांना त्रास देतात. या भागात चोर्‍यामार्‍या आणि इतर गैरप्रकारही वाढलेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या झोपड्या पाडण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

संपादकीय भूमिका 

मडगाव नगरपालिकेला अनधिकृत झोपडपट्ट्या उभ्या राहिल्याचे का लक्षात आले नाही ?