भाजप महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !

सांगली, २६ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यातील जत तालुक्यातील आश्रमशाळेत शिक्षकांकडून ६ मुलींवर अत्याचार झाल्याचे वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार सुमोटो (न्यायालयाने स्वतःहून याचिका प्रविष्ट करणे) चौकशी करून त्या अंतर्गत गुन्हा नोंद करावा, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या वतीने मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस तथा अधिवक्त्या सौ. स्वाती शिंदे यांनी २५ एप्रिल या दिवशी जिल्हाधिकारी श्री. अशोक काकडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. या वेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील, अश्विनी तारळेकर, स्नेहजा जगताप, रेखा सरनोबत, रूपाली अडसुळे, लीना सावर्डेकर उपस्थित होत्या.
या वेळी अधिवक्त्या सौ. स्वाती शिंदे म्हणाल्या की, जत तालुक्यातील एका गावामध्ये आश्रमशाळेतील ६ मुलींवर शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची दबक्या आवाजामध्ये सर्वत्र चर्चा चालू आहे. या गोष्टीची पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेली नसून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. मुलींच्या कुटुंबियांवर दबाव टाकत जात आहे. यापूर्वीही आश्रमशाळेत अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. सांगलीच्या जिल्हाधिकार्यांनी यामध्ये त्वरित लक्ष घालून समाजकल्याण अधिकारी, तसेच पोलिसांच्या स्वतंत्र यंत्रणांकडून ‘सुमोटो’ चौकशी करावी, दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी जिल्हाधिकारी श्री. अशोक काकडे यांनी ‘या घटनेची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिले.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते समजत नाही का ? |