(स्टेटस : म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांच्या स्वतःच्या खात्यावर प्रसारित केलेले चित्र किंवा लिखाण)
सातारा, २६ एप्रिल (वार्ता.) : वाई तालुक्यातील जांभळी या गावातील शुभम कांबळे या युवकाने त्याच्या भ्रमणभाषच्या ‘स्टेटस’ला पाकिस्तानचा झेंडा आणि भारतविरोधी लिखाण ठेवले होते. त्यामुळे वाई पोलिसांनी शुभम कांबळे या युवकाला अटक केली आहे.
२४ एप्रिल या दिवशी संशयित आरोपी शुभम कांबळे याने पाकिस्तानचा झेंडा आणि भारतविरोधी लिखाण भ्रमणभाषच्या स्टेटसला ठेवले होते. शुभमचाच मित्र संकेत चिकणे याने सायंकाळी हे स्टेटस पाहिले. याविषयी संकेतने तातडीने वाई पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली. पहलगाम येथे झालेले आतंकवादी आक्रमण आणि त्यामुळे भारतभर निर्माण झालेले पाकिस्तानविरोधी वातावरण यांचे गांभीर्य लक्षात घेऊन वाई पोलिसांनी शुभम कांबळे यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंदवत शुभम कांबळे यास अटक केली. त्यास वाईतील प्रथमवर्ग न्यायालयात उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती वाई पोलिसांनी दिली.
वादग्रस्त पोस्ट करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार ! – पोलीस![]() पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर सामाजिक माध्यमांवर वादग्रस्त पोस्ट पाठवल्या जात आहेत. यामुळे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होत आहे, तसेच धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. यामुळे सातारा जिल्हा पोलीस दलाची सामाजिक माध्यमांवर लक्ष्य आहे. वादग्रस्त पोस्ट करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची चेतावणी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे. |