आतंकवादी आक्रमणाचा श्रीक्षेत्र तपोभूमी, कुंडई येथे आयोजित सभेत तीव्र शब्दात निषेध

पहलगाम (काश्मीर) येथील आतंकवादी आक्रमणाचे गोव्यात पडसाद

फोंडा, २५ एप्रिल (वार्ता.) – पहलगाम, काश्मीर येथील आतंकवादी आक्रमणाचा श्रीक्षेत्र तपोभूमी, कुंडई येथे २४ एप्रिल या दिवशी आयोजित सभेत तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. तपोभूमी येथील श्री दत्त पद्मनाभ पीठ आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी या निषेध सभेचे आयोजन केले होते. या वेळी आतंकवादी आक्रमणात मृत झालेल्या हिंदूंना श्रद्धांजली वहाण्यात आली. या सभेमध्ये विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी मोहन आमशेकर, बजरंग दलाचे पदाधिकारी संकेत आर्सेकर, हिंदु जनजागृती समितीचे सत्यविजय नाईक, गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, ‘गोवा हिंदू युवा शक्ती’चे सुजन नाईक, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी उपस्थित सहस्रो हिंदु धर्माभिमान्यांनी आतंकवाद्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.