
पुणे – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात पाकिस्तानधार्जिण्या अतिरेक्यांनी पर्यटकांवर धर्म विचारून केलेल्या क्रूर आक्रमणाच्या तीव्र निषेधार्थ २४ एप्रिल या दिवशी अपर डेपो बिबवेवाडी पुणे येथे गोरक्षा सामाजिक संस्था आणि सकल हिंदु समाज यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले,

तसेच २३ एप्रिल या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील भक्ती-शक्ती चौक निगडी येथील नागरिकांनी या आक्रमणाच्या निषेधार्थ मशाल मोर्चा काढला. पाकिस्तानविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता, या वेळी मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप हिंदु बांधवांना श्रद्धांजली वहाण्यात आली. या वेळी निगडी प्राधिकरण परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने जमले होते.
पहलगाम येथे मृत्यूमुखी पडलेल्यांना जुन्नर (पुणे) येथे श्रद्धांजली अर्पण
जुन्नर – पहलगाम येथे मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जुन्नर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शोकसभेचे आयोजन केले होते. विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती इत्यादी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना या शोकसभेत सहभागी झाल्या होत्या.
सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी पहलगाम आतंकवादी आक्रमणाचा तीव्र निषेध !
सातारा, २५ एप्रिल (वार्ता.) – येथील कराड, पाचगणी, लोणंद, पाटण, वाई, फलटण, सातारा या ठिकाणी पहलगाम आतंकवादी आक्रमणाचा निषेध नोंदवण्यात आला. या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढत पोलीस आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शहरातील मुख्य रस्त्यांवरून भारतमाता की जय, वंदे मातरम्, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत मोर्चे निघत आहेत. यामध्ये हिंदु माता-भगिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. व्यापारीवर्गाने बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. |