मुंबई महानगरपालिका धार्मिक स्थळांची स्वच्छता करणार !

मुंबई महानगरपालिका

मुंबई – मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मुंबईतील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली जाणार आहे. मुंबईतील स्वयंसेवी संस्था, नागरिक, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांतून २८ एप्रिल ते ९ मे या काळात प्रतिदिन सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण मुंबईत ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर म्हणाले की, प्रामुख्याने धार्मिक स्थळाभोवतालचा परिसर, वाहनतळ, घनकचरा संकलनाचे ठिकाण, पदपथ आदींची यांत्रिक, तसेच स्वच्छता कर्मचारी यांच्या साहाय्याने व्यापक स्वच्छता करण्यात येईल. अडथळा निर्माण करणार्‍या वस्तूंचे निष्कासन, कचर्‍याचे संकलन आणि पाण्याने संपूर्ण परिसर धुवून काढणे आदी प्रक्रियांचा यामध्ये समावेश असेल. स्वयंसेवी संस्था, तसेच नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे !