
वडगाव शेरी (जिल्हा पुणे) – चंदननगर येथे लागलेल्या आगीत ९० झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जळून खाक झाल्या. आगीमुळे वस्तीतील विविध ठिकाणच्या १५ सिलेंडरचे स्फोट झाले. अग्नीशमनदलाने केलेल्या प्रयत्नामुळे दाट लोकवस्ती असलेल्या या भागात आग पसरली नाही. आगीमध्ये सिलेंडरचा, तसेच वस्तीत उभ्या असलेल्या दुचाकीच्या पेट्रोल टाक्यांचा स्फोट झाल्यामुळे आग पसरली. चंदननगर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी वस्तीतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. धानोरी, तसेच शहरातील इतर ठिकाणच्या अग्नीशमनदलाची ११ वाहने घटनास्थळी आल्याने आग आटोक्यात आली. अग्नीशमनदलाच्या जवानांनी आणि स्थानिकांनी भोवतालच्या परिसरातील १०० सिलेंडर बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुणे महापालिकेच्या अग्नीशमनदलाचे प्रमुख, अग्नीशमन अधिकारी यांसह ८० जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. ‘आगीत बाधित झालेल्या रहिवाशांचा संसार उभा करण्यासाठी समाजातील व्यक्ती आणि दानशूर संस्था यांनी पुढे यावे’, असे आवाहन चंदननगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी केले आहे.