मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

पणजी, २५ एप्रिल (वार्ता.) – सध्या ३ पाकिस्तानी नागरिक अल्पकालीन ‘व्हिसा’वर गोव्यात वास्तव्यास आहेत. त्यांना देश सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. गोव्यात दीर्घकालीन व्हिसावर १७ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत आणि त्यांच्यावर पोलिसांचे लक्ष आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २५ एप्रिल या दिवशी सायंकाळी पणजीत आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २५ एप्रिल या दिवशी दुपारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आणि त्यांना संबंधित राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना ओळखून त्यांना परत पाठवण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस अधिकारी, गृह खात्याचे अधिकारी आणि अन्य सुरक्षा संस्था यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांना तपासनाक्यांवरील सुरक्षेसह नाकाबंदी आणि अन्य सुरक्षात्मक उपाययोजना करण्यासाठी सांगण्यात आले आहे. २६ एप्रिलपासून राज्यभर शोधमोहीम हाती घेतली जाणार आहे.’’