|
सावंतवाडी – बांदा येथील एका धर्मांध शिक्षिकेने तिच्या व्हॉट्सॲपवर आतंकवादी आणि हिंदू यांची मानसिकता एकच दर्शवणारा स्टेटस ठेवल्याचा आरोप ‘हिंदू एकता मंच’ने केला आहे. या प्रकरणी त्या शिक्षिकेच्या विरोधात कारवाई करावी, या मागणीचे निवेदन मंचाच्या सदस्यांनी बांदा पोलीस ठाण्यात दिले. ‘या शिक्षिकेला बडतर्फ न केल्यास मुलांना शाळेत पाठवणार नाही’, अशी चेतावणी हिंदूंनी दिली.
पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे धर्म विचारून आतंकवाद्यांनी निष्पाप पर्यटकांच्या गोळ्या झाडून हत्या केल्या. या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले असून विविध स्तरांवर या कृत्याचा जाहीर निषेध केला जात आहे; मात्र बांदा शहरातील एका शिक्षिकेने २४ एप्रिलला तिच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर या घटनेला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचा आरोप ‘हिंदू एकता मंच’ने केला आहे. २५ एप्रिल या दिवशी सकाळी शहरातील हिंदु धर्मियांनी बांदा पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी करणारे निवेदन दिले, तसेच संबंधित शिक्षिका कार्यरत असलेल्या शाळेत जाऊन तक्रार दिली.
‘जोपर्यंत या शिक्षिकेला बडतर्फ करण्यात येत नाही, तोपर्यंत शहरातील मुलांना शाळेत पाठवणार नाही’, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या शिक्षिकेला तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे समजते.