जम्मू – जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात बनावट कागदपत्रांचा वापर करून खेचर सेवा (पोनी सेवा) पुरवणार्या दोन मुसलमानांना माता वैष्णोदेवी मार्गावर अटक करण्यात आली. मनीर हुसेन आणि साहिल खान अशी या दोघांची नावे आहेत. (बनावट कागदपत्रांचा वापर करून सेवा पुरवली जाणे, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! – संपादक ) पहलगाममधील आतंकवादी आक्रमणानंतर श्री वैष्णोदेवी मंदिर रस्त्यावर गस्त वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी गस्त घालत असतांना श्री गीतामाता मंदिराजवळ एका संशयित व्यक्तीची चौकशी केली. त्या वेळी तिने स्वत:ची ओळख पूरण सिंह अशी करून दिली. त्याची कसून चौकशी केला असता तो मनीर हुसेन असल्याचे उघड झाले. बनावट कागदपत्रांचा वापर करून मनीर हुसेन श्री वैष्णोदेवी मार्गावर खेचर सेवा देत असे. या प्रकरणी कटरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला कह्यात घेतले आहे.
दुसर्या एका घटनेत कोणत्याही वैध अनुमतीविना खेचर सेवा पुरवणार्या साहिल खान नावाच्या आरोपीला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. (अशा आरोपींना कठोर शिक्षा केली पाहिजे, जेणेकरून कुणी असे अवैध काम करू धजावणार नाही ! – संपादक)