श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या ठिकाणी श्रीमती शशीकला पै यांना कुलदेवतेचे दर्शन होणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. महत्त्वाची सेवा मिळाल्याने अहं वाढून साधना नीट न होणे, वर्षभर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची भेट न झाल्याने मन चिंताग्रस्त होणे अन् स्वतःचे मनोगत कुलदेवीकडे व्यक्त करणे 

मला एक महत्वाची सेवा करण्यास सांगितल्यामुळे माझा अहं (कर्तेपणाचे विचार) पुष्कळ वाढला होता. त्यामुळे माझी साधना नीट होत नव्हती. हे माझ्या उशिरा लक्षात आले. मी माझ्या नकारात्मक विचारांमुळे निराश झाले होते. त्या वर्षभरात अनेक वेळा सनातन आश्रमात जाऊनही माझी श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी भेट न झाल्याने मी चिंताग्रस्त झाले होते. त्यामुळे गोवा येथे गेल्यावर प्रत्येक शुक्रवारी मी सनातन आश्रमाच्या जवळील माझी कुलदेवता श्री शांतादुर्गादेवीच्या दर्शनासाठी जात असे आणि तिलाच माझे गार्‍हाणे (मनातील विचार) सांगत असे.

२. साधिकेला अनपेक्षितपणे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची भेट झाल्याने आनंद होणे

ऑगस्ट २०१६ मध्ये मी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातील स्वागतकक्षात उभी होते. अचानक कोणीतरी मागून  माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी मागे वळून पाहिले, तर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ माझ्या मागे उभ्या होत्या. त्या मला म्हणाल्या, ‘‘मला भेटायला तुम्ही का आला नाहीत ? या, आपण खोलीत बसून बोलूया.’’ हे ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या मला त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या.

३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या भोवती पुष्कळ प्रकाश दिसणे आणि त्यांचे बोलणे ऐकून भान हरपणे

श्रीमती शशिकला पै

श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या खोलीत एका पटलावर श्रीकृष्णाची एक मूर्ती ठेवलेली आहे. तिथेच एका आसंदीवर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ  बसल्या. मी त्यांच्यापासून साधारण ४ फूट अंतरावर असलेल्या दुसर्‍या आसंदीवर बसले होते.

त्या वेळी ‘जणूकाही त्या पालखीत बसल्या आहेत आणि त्यांच्या अवतीभोवती असंख्य दिव्यांचा चंद्रप्रकाशासारखा उजेड पडला आहे’, असे मला दिसले. मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंकडे आश्चर्याने पहातच राहिले. त्या अतीसुंदर आणि सात्त्विक दिसत होत्या. त्यांचा सुमधुर आवाज ऐकून माझे भानच हरपले; परंतु मला लहानपणी साबणाचे फुगे उडवतांना त्या फुग्यांचा जसा सप्तरंगी पापुद्रा दिसायचा, तसा एक पातळ पापुद्रा (पडदा) मला आम्हा दोघींमध्ये दिसत होता.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे बोलणे देववाणीसारखे असल्याचे जाणवणे 

मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना माझ्या सेवेतील अडचणी सांगायला आरंभ केला. थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की, मी त्यांना पुष्कळ दिवसांनी भेटूनसुद्धा माझे केवळ विकल्पच सांगत आहे. तेव्हा त्या आपल्या सुमधुर आवाजात समजावणीच्या सुरात मला म्हणाल्या, ‘‘जर मनात विकल्प आले, तर सेवेतील आनंद मिळणार नाही.’’ मी माझ्या डोळ्यांत त्यांचे दिव्य रूप साठवत होते. त्यांचा देववाणीसारखा आवाज माझ्या कानात गुंजत होता. मला आसंदीवर बसलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ एखाद्या देवतेसारख्या दिसत होत्या. १० ते १२ मिनिटांनी मी अत्यंत हर्षभरीत होऊन खोलीबाहेर आले.

५. दुसर्‍या दिवशी सकाळी जाग आल्यावर ‘श्री शांतादुर्गादेवीचे दर्शन झाले’, असा आवाज ऐकू येणे 

मी घरी आल्यावर एखाद्या लहान बाळासारखे वरील सर्व आठवत झोपी गेले. पहाटे मी प्रफुल्लित होऊन डोळे उघडले. तेव्हा माझ्या कानावर आवाज आला, ‘तुला प्रत्यक्ष श्री शांतादुर्गादेवीचे दर्शन झाले. तिने तुला चैतन्य दिले.’ त्या वेळी ‘ज्यांना ज्यांना देव भेटला, त्यांना ते कळलेच नाही; परंतु नंतर देवानेच ते त्यांना सांगितले’, असे मी कुठेतरी वाचल्याचे मला आठवले.

हे गुरुदेवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), माझी काहीच योग्यता नसतांना आणि मी अनंत चुका केलेल्या असतांना केवळ आपल्या प्रीतीमय कृपेने आपण मला प्रत्यक्ष माझ्या कुलदेवीचे दर्शन घडवून आणलेत. यासाठी हे गुरुदेवा, आपल्या कोमल चरणी अनंत कोटी कृतज्ञता आणि साष्टांग दंडवत !’

– श्रीमती शशिकला पै, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.१०.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक