आलिया आपत्काळाशी असावे सादर । सुरक्षित रहावे वाढवोनी भक्तीभाव ।।

‘प्रारब्धामुळे मी जन्मापासून सुख-दु:खाच्या मायाबाजारात अडकलो आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाल्यावर त्यांनी मला अध्यात्म शिकवून साधना करवून घेतली. त्यांनी मला ‘जीवनात घडणार्‍या प्रत्येक प्रसंगाकडे साधनेच्या दृष्टीने कसे पहावे ?’, हे शिकवले. यातून ते ‘मला वरच्या वरच्या चांगल्या मानसिक आणि आध्यात्मिक स्थितींना घेऊन जात आहेत’, असे जाणवते. यासाठी मी त्यांच्या चरणी पुढील कवितापुष्प अर्पण करत आहे.

पू. शिवाजी वटकर

मिळालिया जन्मासी असावे सादर ।
सार्थक करावे करण्या भवसागर पार ।। १ ।।

जोडलिया नात्यांशी असावे सादर ।
जुळवूनी घ्यावे संपवण्या प्रारब्ध घोर ।। २ ।।

आलिया परस्थितीशी असावे सादर ।
स्वीकारावी समजूनी ईश्वरेच्छा अपार ।। ३ ।।

भेटलिया जनांशी असावे सादर ।
स्वत:ला पालटोनी अनुभवावा सुखसागर ।। ४ ।।

मिळालिया ज्ञानाशी असावे सादर ।
चैतन्य मिळवोनी जावे मायेच्या पार ।। ५ ।।

कुळाचिया देवाशी असावे सादर ।
नामस्मरण करोनी श्रद्धेने पाळावा कुलाचार ।। ६ ।।

भेटलिया श्रीगुरूंशी (टीप १) असावे सादर ।
शरणागत व्हावे ठेवूनी हृदयाशी चरण ।। ७ ।।

सांगितलिया साधनेशी (टीप २) असावे सादर ।
पराकाष्ठा करावी गुर्वाज्ञा पाळून ।। ८ ।।

मिळालिया सत्सेवेशी असावे सादर ।
पूर्ण करावी ठेवोनी गुरुचरणांशी भाव ।। ९ ।।

आलिया आपत्काळाशी असावे सादर ।
सुरक्षित रहावे वाढवोनी भक्तीभाव ।। १० ।।

टीप १ –  परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले.

टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितला आहे. ‘१.  स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, २. अहं-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, ३. नामजप, ४. सत्संग. ५. सत्सेवा, ६. भावजागृतीसाठी प्रयत्न करणे, ७. सत्साठी त्याग,

८. इतरांविषयी प्रीती (निरपेक्ष प्रेम)’, ही साधनेची अष्टांगे आहेत.

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.