
पुणे – स्वारगेट येथे झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या विरोधात ८९३ पानांचे आरोपपत्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रथम वर्ग दंडाधिकारी व्ही.ए. मकानदार यांच्या न्यायालयात प्रविष्ट केले आहे. या घटनेत ८२ साक्षीदार पडताळून ५ साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवले आहेत. १२ पंचनामे, गूगल सर्च हिस्ट्री, तुलनात्मक ध्वनीतीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही चित्रीकरण आणि निवेदन या पंचनाम्यातून आरोपी विरोधात भक्कम पुरावे सादर केले आहेत. आरोपी विरोधात भारतीय न्यायसंहिते अन्वये कलम ६४, ६४(२) एम्, ३५१(२), ११५(२) आणि १२७(२) या अन्वये स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा केला. आरोपी दत्तात्रय गाडे सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. तपास अधिकार्यांच्या पथकाने आरोपी विरोधात भौतिक, जैविक, वैद्यकीय, तांत्रिक, परिस्थितीजन्य आणि शास्त्रीय पुरावे गोळा केले आहेत. सरकारी अधिवक्त्यांच्या माध्यमातून त्याच्यावर आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.