वर्षातील केवळ ५ महिने काम चालणार.

पुणे – टेमघर धरणातून पाणीगळती होत आहे. गळती रोखण्याच्या या कामाच्या दुरुस्तीसाठी मंत्रीमंडळाने ७ फेब्रुवारी या दिवशीच्या बैठकीत ३१ कोटी ५ लाख रुपयांच्या व्ययास मान्यता दिली आहे. प्रत्यक्षात दुरुस्तीच्या कामास जानेवारी २०२६ मध्ये प्रारंभ करण्यात येईल, अशी वस्तूस्थिती दिसून येत आहे. या दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक सिद्ध करणे, त्यास मान्यता घेणे, त्यानंतर निविदा प्रसिद्ध होऊन ठेकेदार निश्चित होणे, या कामांसाठी ४ महिन्यांचा अवधी लागेल. पावसाळ्यामध्ये दुरुस्तीचे काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे दुरुस्तीसाठी जानेवारीची वाट पहावी लागेल.
टेमघर धरणातून पुणे शहरासाठी प्रतिवर्ष ३.७१ टी.एम्.सी. पाणी पिण्यासाठी उपलब्ध केले जाते. ही गळती वर्ष २०१६-१७ मध्ये २ सहस्र ५८७ लिटर प्रतिसेकंद इतकी होती. ती गळती रोखण्यासाठी दुरुस्ती कामाला ९१ कोटी ६६ लाख रुपये व्यय झाला. दुरुस्तीनंतर १९७ लिटर प्रतिसेकंद एवढी गळती दिसून आली. वर्ष २०२० पासून निधी असूनही दुरुस्तीच्या कामाला मान्यतेअभावी होत असलेली गळती रोखता आली नाही. सध्या २३२ लिटर प्रतिसेकंद पाण्याची गळती होत आहे. दुरुस्तीचे काम करण्यासाठी जानेवारी ते मे असे ५ महिनेच हाती असतील. हे काम पूर्ण करण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी लागणार आहे.